85000 कोटींच्या `या` प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध
Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सुपिक जमीन या प्रकल्पासाठी द्यावी लागेल असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी श्रमिक महासंघच्या वतीने 18 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपेक्षा सत्ताधारी नेते शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीला शक्तीपीठ महामार्ग प्रकरणाचा जबर फटका महायुतीला बसला. त्यामुळेच हा महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेते एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी एकवटले
माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर, भाजप नेते समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शेतकरी हिताचा नसणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिलाय. तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी देखील हा महामार्ग रद्द करावा अशी आग्रही मागणी केली आहे. शक्तिपीठ महामार्ग हा गावांचा विनाश करणारा असून भांडवलदार आणि कंत्राटदार यांना मालामाल करणार आहे असं श्रमिक महासंघाचे म्हणणं आहे. केवळ संपत्तीची लूट करून हा माल परदेशात पाठवण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला गेला असा आरोप देखील श्रमिक महासंघाने केला आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विरोधकांनी चांगली मोट बांधली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्वामिनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी शेतकऱ्याची चांगली मोट बांधून वातावरण निर्मिती केली आहे.
कसा आहे हा महामार्ग?
- राज्य सरकारने नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
- यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.
- या महामार्गाठी 85 हजार कोटी खर्च होणार आहे.
- या माहामार्गाच्या भूमी संपादनालां सुरूवात झाल्यानंतर तीव्र विरोध सुरू झाला.
- या महामार्गासाठी संपादित करण्यात येणारी जमीन सर्वाधिक सुपीक असल्याच शेतकऱ्यांचे म्हणणं आहे .
सत्ताधारी नेत्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध का केला आहे याची प्रमुख कारणे पाहूया...
- लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या पट्ट्यात महायुतीच्या उमेदवाराला कमी मतदान झाले.
- सत्ताधारी नेत्यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग जात असल्यामुळे याचा फटका विधानसभेला बसू शकतो.
- शक्तीपीठ महामार्ग ज्या भागातून जातो त्या भागांचा विचार केल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 12 जागांचा फटका बसल्याचं सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे.