COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली : पोलीस हवालदार समाधान मानटे खून प्रकरणी हल्लेखोर मुख्य आरोपी झाकीर जामदार पोलिसांच्या ताब्यात घेतलंय. कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिसांनी झाकीर जामदारला ताब्यात घेतलं. तर साथीदार अखतर नदाफ आणि अल्तार पठाण  यांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे.


सांगलीमध्ये मंगळवारी मध्यरात्री एक अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस हवालदार समाधान मानटे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. मानटे यांच्या शरिरात तब्बल १८ वेळा भोसकण्यात आलं. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्सच्या जवळ मध्यरात्री ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हत्येनंतर सांगली शहरात एकच खळबळ माजली आहे. एका पोलिसाचीच हत्या झाल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.


पोलीस दलातील ३० वर्षीय समाधान मानटे यांचा धारदार हत्याराने १८ वार करून अमानुष खून करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. हॉटेल रत्नामध्ये मंगळवारी रात्री सव्वा बारा वाजता ही घटना घडली. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. यामध्ये दोन हल्लेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. 


समाधान मानटे मूळचे बीड जिल्‍ह्‍यातील आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलात ते २०१३ मध्ये भरती झाले आहेत. मिरज शहर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी होती. ते विश्रामबाग पोलीस वसाहतीमध्ये पत्नीसह राहत होते. मंगळवारी रात्री काम संपवून घरी येत असताना ते रत्ना हॉटेलमध्ये गेले होते. काऊंटरवर दोघा ग्राहकांशी त्‍यांचा वाद झाला. त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले. तेवढ्यात वाद झालेले ग्राहक हॉटेलबाहेर निघून गेले. यातील एक जण गाडीतील धारदार हत्यार घेऊन आला. त्याने मानटे यांच्यावर सपासप १८ वार केले. यामध्ये मानटे रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.