मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस उलटली, 2 महिला ठार तर 7 जण जखमी
जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना एमजीएम रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर नजीक माडप बोगद्यात खाजगी बसला अपघात झाला आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराम ही घटना घडली असून यात दोन महिला जागीच ठार झाल्या तर 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना एमजीएम रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
कविता पलेंगे (वय 41) रा. ठाणे आणि फातिमा सालेह (89) (ही यमन देशातील आहे) अशी मृतांची नावे आहेत.
शर्मा ट्रॅव्हल्सची खाजगी स्लीपरकोच बस बंगळूरहून मुंबईकडे निघाली होती. माडप बोगद्ययात मधोमध आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली आणि बोगद्याच्या टोकापर्यंत फरफटत गेली. या बसमधून चालकासह 20 प्रवासी प्रवास करत होते. अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलीस, खालापूर पोलीस, आयआरबी पथकाने घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्त बस बाजूला केली. बोगद्यात अपघात झाल्याने मदतकार्यात अडथळे येत होते.