पाण्यासाठी चिमुकल्याचा जीवाशी खेळ
या चिमुकल्याला पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. दुष्काळामुळे अनेकांना मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. घरातील मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यंत सर्वांनाच हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. औरंगाबादमधील सिद्धार्थ नावाचा चिमुकला घरच्यांसाठी रोज पाणी आणतो. हा चिमुकला आपल्या कुटुंबासाठी धावत्या रेल्वेतुन पाणी आणून, आपल्या कुटुंबीयांची तहान भागवतो आहे.
पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घरात सिद्धार्थ राहतो, याचं वय आठ वर्ष आहे. मात्र इतक्या छोट्या वयात सिद्धार्थवर त्याच्या कुटुंबाची तहान भागवण्याची जबाबदारी आली आहे. आईला दोन महिन्यांपूर्वी बाळ झालं. त्यामुळे ती घरीच, वडील आजारी असल्याने अंथरुणाला खिळलेले, इतर सगळी लहान भावंड, घरात मोठं कोणी नाही म्हणून सिद्धार्थवर घरच्यांसाठी रोज पाणी आणण्याची मोठी जबाबदारी आली आहे.
जवळपास पाण्याची कुठलीही सोय नाही. बोरवेल सुद्धा आटलेले, त्यामुळे पाणी आणण्यासाठी सिद्धार्थला रोज रेल्वेमध्ये जावं लागतं, सिद्धार्थच घर औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाशेजारी आहे. तिथं रोज दुपारी अडीच वाजता एक रेल्वे येते दोन मिनिटं ही रेल्वे मुकुंदवाडी स्थानकावर थांबून मुख्य स्थानकाकडे जाते. सिद्धार्थ रोज याच ट्रेनची वाट पाहत उभा असतो. मुकुंडवाडीला ही रेल्वे आली की लगेच हातातल्या पाण्याच्या दोन केन रेल्वेत चढवतो आणि त्याचा रेल्वे स्टेशनकडे प्रवास सुरू होतो.
रेल्वे स्थानकात गेल्यावर रेल्वेच्या शौचालयात पाणी भरण्यासाठीचे पाईप असतात त्या पाईपने सिद्धार्थ आपल्या पाण्याच्या कॅन भरतो. पुन्हा अर्धा तास रेल्वे थांबल्यावर परत त्याच रेल्वेने सिद्धार्थचा परतीचा प्रवास सुरू होतो. गेली दोन महिने सिद्धार्थची अशीच कसरत सुरु आहे. पाण्याची दुसरी सोय नाही आणि त्यामुळे हा चिमुकला नकळतपणे असा जिवाशी खेळतो, त्याच्या आईलासुद्धा याची भीती वाटते मात्र करू तरी काय अशी हतबलता तिने व्यक्त केली आहे.
भीती वाटते मात्र पाणी आणायला दुसरं कुणी नाही, त्यामुळं नाईलाजास्तव पाठवावं लागतं असल्याचं सिद्धार्थच्या आईने म्हटलंय.
फक्त सिद्धार्थच नाही तर या परिसरातील अनेक नागरिक रोज याच पद्धतीने या रेल्वेची वाट पाहत असतात आणि घरासाठी पाणी नेतात. कारण पाण्याची दुसरी कुठलीही सोय नाही. धक्कादायक म्हणजे हा भाग औरंगाबाद महापालिकेच्या अखत्यारित येतो. मात्र, तरीसुद्धा तिथे पाण्याची सोय नाही, रेल्वे स्टेशनवर कधी पाणी भरायला गेल्यावर गार्ड मारहाण सुद्धा करतात, पाण्याशिवाय जगणेही कठीण असल्याने याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचं या वस्तीतील नागरिकांनी म्हटलंय.
पाण्यासाठीची ही धडपड दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने रोज धडपडत रेल्वेत चढणं आणि उतरणं यात जीवही जाऊ शकतो. मात्र पाण्यासाठी रोज मुकुंदवाडी परिसरातील या गरीब नागरिकांना हे धाडस करावं लागतं, नुकताच शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. मात्र सिद्धार्थ सारख्यांची ही धडपड पाहून यांचं भविष्य तरी आहे का असा प्रश्न पडतो, किमान ही धडपड तरी पाहून यांच्या पाण्याची काही सोय व्हावी हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.