पावसाळा आला की, आजारांच्या संख्येतही वाढ होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात साथीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढते. महाराष्ट्रात, पावसाळी रोगांपैकी मलेरिया सर्वात प्राणघातक ठरत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जुलै महिन्यापर्यंत राज्यात मलेरियाचे एकूण ९०२५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये यंदा तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोलीत सर्वाधिक 3745, चंद्रपूरमध्ये 397, मुंबईत 2852 आणि नवी मुंबईत 546 रुग्ण आढळले आहेत. देशातील 12 राज्ये मलेरियामुक्त करण्यासाठी केंद्र सरकार डासांच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे. 25 एप्रिलपासून मोहिम सुरु झाली असून राष्ट्रीय डासजन्य रोग नियंत्रण केंद्राच्या देखरेखीखाली ही मोहिम मार्च 2027 पर्यंत चालवली जाणार आहे.


मुंबईत देखील साथीच्या आजाराचं थैमान


मुंबईत जुलैमध्ये साथीच्या आजारांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचं पहायला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे गॅस्ट्रोचे सापडले आहेत. त्यानंतर हिवताप असणाऱ्या रुग्णांची संख्या ही 797 आहे. डेंग्यूचे 535, स्वाईन फ्लूचे 161 रुग्ण, कावीळ असणारे 146 रुग्ण, लेप्टोचे 141 रुग्ण तर चिकुनगुन्याचे 25 रुग्ण मुंबईत आढळले आहेत.  जूनच्या तुलनेत जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 


गडचिरोलीमध्ये हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण


राज्यात साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. राज्यात आठवडाभरात हिवतापाचे 1578 रुग्ण तर डेंग्यूचे 814 रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण हे गडचिरोलीमध्ये सापडले आहेत. गडचिरोलीमध्ये 266 रुग्ण आहेत. मुंबईत 249 रुग्ण आणि चंद्रपूरमध्ये 76 रुग्ण आहेत. 


काय आहे मलेरियाची लक्षणं


ताप, डोकेदुखी आणि थंडी ही मलेरियाची प्राथमिक लक्षणे असून मलेरियाचा डास चावल्यानंतर 10-15 दिवसांत ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे कधीकधी सुप्त किंवा कमी तीव्रतेची असतात आणि पटकन लक्षात येत नाही. मात्र, त्यावर चोवीस तासात उपचार न केल्यास जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.