निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा (Diwali) सण साजरा करण्यात येत आहे. हवेची गुणवत्ता ढासळल्याने न्यायालयाने फटाके फोडण्याची वेळ ठरवून दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी याचं उल्लंघन होताना दिसत आहे. दुसरीकडे काही हुल्लडबाज तरुणांनी चक्क थिएटरमध्येच फटाके (Theater) फोडले आहेत. सलमान खान याचा टायगर 3 चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या त्याच्या चाहत्यांनी कळस गाठत थेट थिएटरच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. या सगळ्या प्रकारामुळे थिएटरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा सिनेमागृहात फटाके व आतषबाजी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालेगावच्या मोहन थिएटरमध्ये सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाच्या शेवटच्या शो दरम्यान हा सगळा प्रकार घडला. पडद्यावर अभिनेत्याची एन्ट्री होताच हुल्लडबाज चाहत्यांनी चक्क चित्रपटगृहातच जोरदार मोठे मोठे फाटके फोडून आतशबाजी सुरु केली. बराच वेळ हा प्रकार सुरु होता. या प्रकारामुळे इतर प्रेक्षकांचा जीव धोक्यात आला होता. या प्रकारामुळे आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी देखील होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने असे काही घडलं नाही. दरम्यान मालेगावमध्ये चित्रपटगृहात फटाके फोडण्याचे प्रकार सातत्याने होत आहे. त्यामुळे आता चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी अशा हुल्लडबाज चाहत्यांना आळा घालण्याची मागणी होत आहे.



फटाक्यामुळे नागपुरात आगीच्या 17 घटना


नागपुरात फटाक्यामुळे शहरात विविध ठिकाणी आगीच्या 17 घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाने याबाबत माहिती दिलीय. यामध्ये शहरातील त्रिमूर्ती नगरला 3, लकडगंज 2 घटना आगीच्या घटना घडल्या आहेत. तर गंजीपेठ,कॉटन मार्केट,सुगत नगर, वैशालीनार, महाल परिसरातही आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आधीच्या या सर्व घटना कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. शिवाजी नगर येथेही एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे.