मालेगाव : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadhi Government) स्थापन झालं. यादरम्यान, या तीनही पक्षांमध्ये आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आपल्या पक्षातील लोकांना आघाडी सरकारमधील इतर पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये, असा अलिखित शाब्दिक करार करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मालेगाव महापालिकेतील (Malegoan Corporation) काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडीचा करार विसरून पक्षात येणं जाणं सुरुच असल्याचं वक्तव्य केलं. 


मालेगावमध्ये (Malegaon) काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. शहरातील एकूण २७ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मालेगावमधील काँग्रेसचे (Congress) सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) कुटुंबियांत गेले सहा महिने सुरु असलेले राजकीय नाट्य आज संपलं. रशीद शेख हे पत्नी आणि महापौर ताहेरा शेख यांच्यासह सत्तावीस नगरसेवकांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेशी केला आहे. 


'प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महाविकास आघाडी असली तरी प्रत्येकाला आपला पक्षाला वाढवण्याचा अधिकार आहे, यापूर्वीही आघाडीचे सरकार होते तेव्हा काँग्रेसचे लोक आमच्याकडे यायचे आमचे त्यांच्याकडे जायचे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


हा प्रवेश कार्यक्रम मालेगावला मोठा करायचा होता. पण कोरोना आला, नियम आहेत ते आपणच कसे तोडायचे, त्यामुळे इथे कार्यक्रम करायचं ठरवलं असं अजित पवार यांनी म्हटलं.  मालेगावला चांगला निधी देण्याचं काम करू असं सांगतानाच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करतात त्याबद्दल तुमचे आभार, पण तुमच्या कृतीतुन राष्ट्रवादीला कमीपणा होऊ देऊ नका, आजपासून तुमची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.


तुमच्या वरती आगीतून फुपाट्यात आल्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही. महापालिकेला निधी द्यायचा आमचा प्रयत्न असतो, चांगल्या पद्धतीचे निधी हा मालेगाव महापालिका द्यायचा प्रयत्न आम्ही करु, असं आश्वासनही यावेळी अजित पवार यांनी दिलं.


भुजबळांचा वेगळाच तर्क
या पक्ष प्रवेशामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी  असल्याची चर्चा सुरु आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी वेगळाच तर्क मांडलाय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही एकमेकांना त्रास देणार नाही असं ठरवलं आहे. पण मालेगावात नगरसेवकांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यानंतर ते एमआयएममध्ये जाणार अशी चर्चा होती.  त्यामुळे आम्ही विचार केला दुसरीकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे आलेलं चांगलं. आम्ही त्यांना सांगितलं आमचे दरवाजे खुले आहेत, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे.