चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे.  शेरू सिंग असे कामगाराचे नाव आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उल्हासनगरच्या श्रीराम चौक परिसरात शांती सर्विस स्टेशन नावाने भारत पेट्रोल पंप आहे. या पंपावर सोमवारी रात्री १० वाजल्याच्या सुमाराला एक चालक पेट्रोल भरण्यासाठी आला असता त्याला कमी पेट्रोल मिळाल्याचा त्याने आरोप केला. शिवाय पेट्रोल भरताना कामगार शेरू सिंग याच्या हालचालीही संशयास्पद असल्याचा आरोप करीत त्याने इतर जमलेल्या ७ ते ८ नागरिकांसह शेरू सिंग या कामगाराला चांगलाच चोप दिला.


 पेट्रोल पंप चालकाच्या देखील ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. कामगाराला चोप देतानाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी या कामगाराला ताब्यात घेतले. 



 
 मात्र तक्रार देण्यासाठी कोणी न आल्याने पोलिसांनी रात्री उशिरा त्याला सोडून दिले. या घटनेवरून आजही पेट्रोल पंपावर मापात पाप करत असल्याचे घटनेवरून पुन्हा समोर आले आहे. 
 
 मात्र मारहाण करणारा नागरिक बाटलीत पेट्रोल मागवत होता. त्याला न दिल्याने त्याने कामगाराला नागरिकांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोप पंपावर वरील काम करणाऱ्या कामगारांनी केला. 
 
 याबाबत पंप व्यवस्थापक विजय यांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत, कॅमेऱ्या समोर बोलण्यास टाळले. तर शेरू सिंग हा कालच्या घटनेमुळे आजारी पडल्याने तो आज कामावर आला नसल्याची माहिती त्याच्या सहकारी कामगारांनी दिली.