Malshej Ghat Tanker Accident :  मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुधाचा टॅंकर आणि मालवाहू टँकरमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. तसेच रस्त्यावरही बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 


दुधाचा टँकर खाली कोसळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटातील भोरांडे गावाजवळ हा अपघात झाला. यावेळी आळेफाट्याचे दिशेने कल्याणकडे जाणारा दुधाचा ट्रक आणि माळशेज घाटाकडे जाणारा भाजीपाल्याचा टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दुधाचा टँकर रोडपासून खाली कोसळला. यात टेम्पोचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  


मृतांमध्ये पती-पत्नींचा समावेश


माळेशज घाटात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नींचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अक्षय दिघे आणि त्यांची पत्नी तेजस दिघे अशी या दोन मृतांची नावे आहेत. ते दोघेही पोलीस आहेत. तर त्यांच्या गाडीचा चालक वामन यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात एक लहान मुलगा जखमी झाला असून त्याला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


वाहतूक सेवा विस्कळीत


दरम्यान या अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. यामुळे रस्त्यावर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. तसेच माळशेज घाटात सतत अपघाताची मालिका सुरु असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच सुरक्षिततेचा प्रश्नही पाहायला मिळत आहे.