पुण्यातील त्या मर्डरचा पोलिसांनी 48 तासात केला उलगडा, धक्कादायक कारण आलं समोर
पुण्यामध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या खूनामागचं सत्य आलं समोर
अरूण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यामध्ये आंबेगाव खुर्द इथं जांभुळवाडीमध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे. महादेव दुपारगुडे असं मृत व्यक्तिचं नाव होतं. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidhyapeeth Police Station) 48 तासात या खूनामागच्या आरोपींना गजाआड केलं आहे. चौघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. (Pune Crime News)
जांभुळवाडी दरी पुलाखालील पिलरलगत जय गणेश ग्रुप फॅक्टरीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर महादेव दुपारगुडेचा मृतदेह फेकून दिला होता. मृतदेहाचा फोटो व्हाट्सअपवर व्हायरल केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटली. नात्यातील महिलेला मेसेज केल्याने महिलेच्या पतीने दोघांच्या साथीने खून केला होता.
महादेव दुपारगुडे आरोपी तुषार मेटकरीचा चुलत मेव्हणा होता. तुषार मेटकरीच्या पत्नीला महादेव दुपारगुडे वारंवार मेसेज करत होता. ते मेसेज अश्लील असायचे. त्यानंतर तुषार मेटकरीने आपले दोन चुलत मेव्हुणे आणि पत्नीच्या साथीने महादेव दुपारगुडेला धायरीजवळ19 तारखेला बोलावलं. महादेव दुपारगुडे तिथं गेल्यावर सर्वांनी मिळून त्याचा खून केला. पोलिसांनी तुषार मेटकरी, विनोद दुपारगुडे, विनोद चौधरी आणि आशा यांना अटक केली आहे.