Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दर्शना पवार असो किंवा एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीवर हल्ला अशा अनेक घटनांमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून आणखी एक गुन्हा पुण्यात घडला आहे. वयाने मोठ्या असलेल्या महिलेवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संकेत शहाजी म्हस्के असं या तरुणाचे नाव आहे. कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट येथे बुधवारी सकाळी सात वाजता हा प्रकार घडला आहे. संकेत आणि तक्रारदार महिलेची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. तक्रारदार महिला या खराडी येथे नोकरी करतात तर त्यांचा घटस्फोट झाला आहे. संकेतसोबत ओळख झाल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. 


पीडित महिलेची संकेतसोबतच आणखी एकासोबत मैत्री झाली होती. तर काही दिवसांपूर्वीच त्याचा पूर्वाश्रमीचा पती पुन्हा त्यांच्या संपर्कात आला होता. त्यामुळं संकेत अस्वस्थ होता. एक महिन्यापूर्वीच त्याने महिलेला प्रपोज केले होते. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणत तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने त्याला विरोध करत नकार दिला. तसंच, आपल्यात फक्त मैत्री राहू शकते, असं सांगत नकार दिला. तसंच, त्याचा नंबरही ब्लॉक केला होता. मात्र, काही दिवसांनी त्यांनी त्याला पुन्हा अनब्लॉक केले. 


बुधवारी सकाळी सात वाजता फिर्यादी बर्निंग घाट येथे मित्राकडे जात होत्या. त्याचवेळी संकेत त्याच्या मागून रिक्षातून येत महिलेला गाठले व त्यांच्या दंडाला पकडले. तू मला भेटत का नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडते, तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत शिवागाळ केली. तसंच, महिलेच्या हातावर लाकडी दांड्याने मारहाण केली. 


संकेतने लाकडी दांड्याने वार करताच महिला खाली पडली तेव्हा त्याने त्यांच्या डोक्यात वार केला. वार वर्मी लागल्याने त्यांना गंभीर इजा झाली व डोक्यातून रक्त येऊ लागले. रक्त येत असल्याचे पाहून संकेत घाबरुन पळून गेला. सध्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेच्या जबाबावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.