किरण ताजणे, नाशिक :  कोरोना पसरवण्याची धमकी देत पैसे उकळण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. पोलिसांनी या तरुणाला बेड्या ठोकल्या. पण त्याआधी नाशिकच्या एका पेट्रोलपंपावर हा धक्कादायक प्रकार घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या लोकांच्या मनात कोरोनाविषयी असलेल्या भीतीचा गैरफायदा घेण्याचा कोण, कसा करेल हे सांगता येत नाही. नाशिकमधल्या एका पेट्रोलपंपावर एक ३२ वर्षांचा तरुण आला आणि त्याने एका कर्मचाऱ्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे वसूल करण्यासाठी त्याने दिलेली धमकी तर आणखीच धक्कादायक होती. या तरुणाने कर्मचाऱ्याला सांगितले की त्याला कोरोना झालाय आणि पैसे दिले नाही तर तो कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकेल. विशेष म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक फैलाव असलेल्या मालेगावहून आल्याचंही त्याने सांगितले. त्याने मालेगाववरून आल्याचं सांगितल्याचं पेट्रोल पंपावरील लोकांनी ऐकल्यानंतर तिथे क्षणभरात घबराट पसरली.


या प्रकाराची माहिती पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस लगेच तिथे दाखल झाले.  


पोलिसांनी या तरुणाला अटक केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला कोरोना झाला आहे की नाही याबाबत खात्री केली. न्यायालयाने या तरुणाला जामिनावर सोडलं असलं तरी पोलिसांनी त्याला क्वारंटाईन केलं आहे.


याबाबत बोलताना तक्रारदार तुरफस शेख यांनी सांगितले की, रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दीपक नाडे नावाचा तरुण आला होता. दोन हजार रुपये द्या अशी मागणी केली होती. मला कोरोना झाला आहे असं सांगून धमकी देत होता. आम्ही त्याला इथून घालवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकतच नव्हता. नंतर पोलिसांना बोलावले आणि पोलिसांनी कारवाई केली आहे.


या प्रकाराबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ म्हणाले, पेट्रोल पंपावर एक व्यक्ती पैशाची मागणी करत असल्याचं कळलं होतं. तपासणीत तो कोरोनाच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी पैसे मागत असल्याचं निष्पन्न झाले होते. त्याने पैसे द्या नाहीतर अंगावर थुंकेल अशी धमकी दिली होती.



पैसै उकळण्यासाठी गुन्हेगार काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. पण कोरोनाबाबत लोकांमध्ये असलेल्या भीतीचा गैरफायदा घेण्याचा हा प्रयत्न या तरुणाच्या अंगलट आला.