नाशिकः पाळीव मांजरावरुन वाद, शेजाऱ्यांचे भांडण इतकं वाढलं की थेट पोलिसांत गेले
Nashik News Today: नाशिकमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. पाळीव मांजरावरुन झालेला वाद इतका विकोपाला गेला की भांडण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले
योगेश खरे, झी मीडिया
Nashik News Today: कधी कोणत्या कारणावरुन वाद होईल याचा काही नेम नाही. नाशिकमध्ये एका भलत्याच कारणावरुन वाद झाला आहे. एका पाळीव मांजरावरुन (Pet Cat) दोन कुटुंबांमधील वादाने टोक गाठले होते. इतंकच नव्हे तर हे भांडण पोलिस ठाण्यातही (Nashik Police) गेले होते. तर गुन्हेही दाखल झाले आहेत. (Nashik Crime News)
आमचे पाळीव मांजर आपल्या घरात आहे का? असा प्रश्न विचारल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद इतका विकोपाला गेला की शेजाऱ्यांनी अल्पवयीन मुलाला त्याच्या घरच्यांचा समोरच मारहाण केली आहे. बजरंग वाडी परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शेजाऱ्यांनी अल्पवयीन मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत वाद इतका विकोपाला गेला अल्पवयीन मुलाच्या घरच्यांनी समोरच्यांवर मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय घडलं नेमकं?
घटना घटना अशी घडली की, नाशिकच्या बजरंगवाडी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाची मांजर शेजारच्या बंगल्यात गेली. एक अल्पवयीन मुलगा हीच मांजर घ्यायला गेल्याने बंगल्यामधील असणाऱ्या मालकिन बाईने या मुलाला तू आत मध्ये कसा आला? असा प्रश्न विचारून मारहाण करायला सुरुवात केली. यावर मुलाने सांगितलं की मी मांजर घेण्यासाठी आलो आहे, असं सांगून देखील महिलेने मारहाण केली आणि आपल्या पतीला आवाज दिला.
मांजर घेण्यासाठी आलेल्या मुलाला पतीने देखील मारहाण केली, असा आरोप घरच्यांनी केला आहे. मांजर घेण्यासाठी गेलेल्या या अल्पवयीन मुलाच्या डोक्याला आणि हाताला जबर मार लागला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र मांजरीवरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेले यामुळे परस्परांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर अधिक तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन करत आहे.