शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : पतीला असाध्य आजारानं ग्रासलं त्यात उपचारांसाठी भरमसाठ खर्च मग अशा परिस्थितीत घर चालवायचं कसं आणि पतीचं जीवन वाढवायचं कसं? हाच प्रश्न मंजुषा कुलकर्णी यांच्या पुढे आहे. तात्पुरता हा प्रश्न त्यांनी सोडवला असला तरी यावर कायमस्वरुपी उपाय त्यांना हवाय... पतीच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी मदतीचा हात त्यांना हवाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातलं कुलकर्णी दाम्पत्याची ही व्यथा... शेरा गावात त्यांची पाच एकर शेती... त्यांच्या दोन मुलींची लग्न झाली. २०१२ साली विनायक यांना अप्लास्टिक अॅनिमिया या दुर्मिळ आजारानं ग्रासलंय. या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्त तयार होत नाही. त्यामुळं स्वाभाविकच सतत रक्त चढवत रहावं लागतं. 


विनायक यांच्या आजाराचं निदान व्हायला वेळ लागला. उपचारांसाठी विनायक यांची पत्नी मंजुषानं तीन एकर शेती गहाण ठेवली. लातूर आणि त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. महिन्यातून चार वेळा त्यांना रक्त द्यावं लागतं. उपचारांचा खर्च वाढतच गेला अखेर मंजुषा यांनी कंबर कसली आणि लातूरच्या गुगळे हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी स्वीकारली. तिथेच त्यांच्या पतीवर उपचारही सुरू करण्यात आले. 


उपचारांसाठी महिन्याकाठी १५ ते २० हजारांचा खर्च येतो. खर्च भलामोठा असला तरी आपण काबाड कष्ट करू पण पतीला काहीही होऊ देणार नाही, असा निर्धार मंजुषा त्यांच्या अश्रुंमधून व्यक्त करतात. आर्थिक अडचणींमुळे मुलाच्या शिक्षणातही अडथळे येतायत. मदतीसाठी त्या उंबरठे झिजवतायत पण हाती यश येत नाहीय.


अप्लास्टिक अॅनिमियाचे रुग्ण फार क्वचित आढळतात. मंजुषा यांची पतीसाठीची धडपड पाहून गुगळे रुग्णालयानं त्यांना नोकरी दिली. तसचं विनायक यांच्या उपचारांत मोठी सुटही दिली. याच रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या गजानन बोळंगे या तरुणानंही विनायक यांच्या उपचारांसाठी मदतीचे हात मिळवून दिलेत. मंजुषा या आधुनिक सावित्रीचा पतीच्या आयुष्यासाठी लढा सुरुय. आता गरज आहे ती मदतीच्या हातांची...