नागपूर : विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असं जम्बो रुग्णालय मानकापूर स्टेडियमला उभारण्यात येणार आहे. येथे सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध राहणार असल्याची  माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड रुग्णांसाठी मुंबई तसंच पुण्यात 'जम्बो हॉस्पिटल'ची स्थापना करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शहरात देखील एक हजार रुग्णांसाठी 'जम्बो हॉस्पिटलची स्थापना करण्याच्या दृष्टीने राधास्वामी सत्संग (कळमेश्वर), शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत  स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची माहिती पालकमंत्री राऊत यांनी रविवारी एक बैठकीत घेतली. त्यानंतर मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचं पालकमंत्री राऊत यांनी सांगितलं.


विदर्भातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसंच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणं, त्याशिवाय शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी जम्बो हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येत आहे. जम्बो हॉस्पिटलच्या निर्मितीमुळे कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करणंही डॉक्टरांना सोयीचं होईल, असा विश्वास पालकमंत्री राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.