निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : वजन उचलणे ही पुरुषांची मक्तेदारी  मोडीत काढलीय मनमाडच्या मुलींनी... 'वेटलिफ्टिंग'मध्ये मनमाडच्या मुलींचा बोलबाला आहे... यंदा  राज्याच्या शालेय संघात  मनमाडच्या आठ 'वेटलिफ्टिंग'पटूंनी स्थान पक्कं केलंय.


मोठ्या शहरांचं वर्चस्व मोडीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात आता वेटलिफ्टिंग खेळ रुजू लागलाय. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटुंनी या खेळात आपलं भक्कम स्थान निर्माण करून सातारा, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईचं वर्चस्व मोडीत काढलंय.


राष्ट्रीय पातळीवर निवड


शालेय असो राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय सगळ्या स्पर्धांमध्ये मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंगपटू पदकाची कमाई हमखास करतातच... मुलींच्या वेटलिफ्टिंगमधल्या या भक्कम कामगिरीच्या जोरावर अनेकदा  नाशिक जिल्ह्याला सांघिक विजेतेपदक मिळालंय. नुकत्याच सांगलीमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय  शालेय स्पर्धेत १९ वर्षांच्या आतील गटात निकिता काळे, नूतन दराडे, अनामिका शिंदे, करुणा गाढे, साक्षी पांडे यांनी तर १७ वर्षांच्या आतील गटात खुशाली गांगुर्डे, धनश्री पवार आणि पूजा परदेशी यांनी  सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, राष्ट्रीय पातळीवरील निवडण्यात आलेल्या संघात  मनमाडच्या या आठ वेटलिफ्टिंगपटुंनी त्यांचं स्थानही पक्कं केलंय.


पदांचं अर्धशतक


मनमाडच्या मुली सातत्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदकांची कमाई करतायत... त्यामुळे वेललिफ्टिंगमध्ये मनमाडला पदांचं अर्धशतक केव्हाच पूर्ण झालंय. गेल्या वर्षीच निकिता काळेंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या संधीचं सोनं करत तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवलं. तिच्यासारखीच कामगिरी करण्याची इतर खेळाडूंचीही इच्छा आहे.


यशात प्रशिक्षकांचा मोठा वाटा


मनमाडच्या या यशस्वी मुलींच्या यशात क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारेंचा मोठा वाटा आहे... व्ययवहारे सर रोज चार चार तास जयभवानी व्यायाम, शाळेत मुलींचा सराव करून घेतात. विशेष म्हणजे कुठलेही शुल्क न घेता मनमाडसारख्या ग्रामीण भागातून दर्जेदार वेटलिफ्टिंगपटू  घडविण्याचं  काम ते करतायत. 


राज्य आणि  राष्ट्रीय  पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या मुलींनी बोलबाला कायम ठेवलाय. या सगळ्या धाकड मुलींचं अभिनंदन आणि त्यांना पुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा...