बाळूमामांच्या नावावर फसवणूक करणारा भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात, पुणे पोलिसांची कारवाई
या भोंदूबाबावर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत
बारामती : संत बाळूमामा म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. त्यांचं मूळ स्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपुरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, त्यांच्या नावानं एका बाबानं बस्तान मांडल्याचा आरोप होत होता. मनोहर भोसले असं या बाबाचं नाव. करमाळा तालुक्यातल्या उंदरगावचा मनोहर भोसले स्वत:ला बाळूमामांचा वंशज आणि शिष्य म्हणून बनाव करत असल्याचा आरोप कोल्हापूरच्या आदमापूर ग्रामपंचायत आणि बाळूमामा देवालय ट्रस्टनं केला होता.
संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहरमामा भोसले याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. साताऱ्यात ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी मनोहर भोसले यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली आहे.
मनोहरमामा भोसले याच्यावर फसवणुकीचे (Cheating) अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा (Sexual Harassment) गुन्हाही करमाळा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
बाळूमामांनी आपलं सारं आयुष्य गोर गरिबांसाठी वेचलं. त्यांनी कधी कुणाकडून एक दमडीही घेतली नाही. मात्र त्यांच्याच नावानं देवत्वाचा बुरखा पांघरून कुणी सामान्यांची लूट करत असेल तर अशा भोंदूला चांगलीच अद्दल घडवण्याची मागणी आदमापूर ग्रामपंचायतीनं केली आहे.