Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना आई-बहिणीचा उल्लेख केल्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यांना काय चौकशी करायच्या आहेत त्या ते करु शकतात असंही ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विधानावर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला. छत्रपतींचे विचार सोडता का? असं त्यांनी मला विचारलं आहे. माझ्याकडून अनावधानाने ते शब्द वापरले गेले. माझ्या तोंडून आई-बहिणीचा उल्लेख झाला असेल तर ते मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. कारण आई-बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा नाही. मीदेखील छत्रपतींचे विचार मानतो," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकाही केली. "नेटवर्क बंद करणं, लोकांमध्ये वातावरण निर्माण करणं ही सगळी देवेंद्र फडणवीसांची किमया होती. पण मी राज्यात अशांतता निर्माण होऊन देणार नाही. त्यांचा डाव हाणून पाडणार.  शांततेत आंदोलन करणार. कायमस्वरुपी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मी मागे हटणार नाही. तोपर्यंत त्यांना काय चौकशा कराव्यात त्या करु देत", असं आव्हानच त्यांनी दिलं. 


सध्या माझी प्रकृती अत्यंत चांगली आहे. 17 दिवस उपोषण केल्याने फार त्रास झाला. पण डॉक्टरांनी चांगले उपचार दिले. अजून काह दिवस राहावं लागेल असं त्यांनी सांगितलं आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.  


विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी कोणी कोणाची आई-बहिण काढत असेल तर विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असो, हा देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी उभा राहिल अशा शब्दांत जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, "आमच्या आया-बहिणीच्या छाताडवर नाचलात, गोळ्या घातल्या तेव्हा वाईट वाटलं नाही का? आणि आज वाईट वाटत आहे. आमच्या आई-बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिला आणि वरुन हाणलं. 20 पोलीस एका महिलेला मारहाण करत होते. उचलून आपटता का, विटा डोक्यात हाणता त्याच्या. तुमची आई म्हटलं तर किती लागलं. आमच्या आया-बहिणी उभ्या चिरल्यात तेव्हा कुठे गेला होता एसआटी नेमणारा?". 


"सत्ता हातात आली म्हणून त्याचा दुरुपयोग करु नका. मी पळून जाणाऱ्यातला नाही. मराठ्यांच्या आय़ा-बहिणीवर हात उचलून देणार नाही. मला हवं तर जेलमध्ये टाका, मी 50 वर्षं शिक्षा भोगायला तयार आहे. आमच्या आया-बहिणीच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. चारही बाजूला टाके आहेत, पाय मोडले आहेत. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आई-बहिणी सगळ्यांच्या आहेत, त्यांचं रक्षण करा. जर कोणी विरोधात बोलत असेल तर माफ करु नका. याच्या हातात सत्ता आहे म्हणून एसआयटी नेमण्यास लगेच परवानगी दिली.  मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे," असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.