Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!
Manoj Jarange Patil On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दसरा मेळाव्यात शपथ घेतली. जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीचं कौतुक केलं. मात्र शिंदेंना आरक्षण (Maratha Reservation) देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत चर्चांना वाट करुन दिली.
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil ) समाधान व्यक्त केलं. मात्र, सोबतच एक गुगली टाकली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? असा सवाल विचारत आम्हाला त्याला शोधावं लागेल, असं सूचक विधान जरागेंनी केलंय. त्यामुळे आरक्षणापासून मुख्यमंत्र्यांना अडवणारे झारीतले शुक्राचार्य कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मराठा आरक्षणासाठी शपथ घेतल्याबद्दल जरागेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतंय असं म्हणत चर्चांचा धुरळाही उडवून दिला. त्यामुळे जरांगे-पाटलांचा रोख नक्की कुणाकडे आहे याची चर्चा सुरु झालीय. काही तरी आत शिजतंय. नाही तर त्यांनी शपथ घेतली नसती. 40 दिवस घेतले नसते. विरोध करणारे कोणी तरी आत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आमच्या अशाच पिढ्या जाणार का शोधायला? त्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला तर ते पाळतात हे त्यांची ख्याती आहे. त्यांनी शपथ घेतली. त्याचं कौतुक आहे. आदर आहे. पण आमच्या लेकराबाळांचाही प्रश्न आहे. त्यामुळे थांबणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणावर बसलेल्या जरांगेंना सरकारने उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. मात्र जरांगेंनी ती फेटाळून लावलीय. मंत्री गिरीश महाजनांनी उपोषणाला बसलेल्या जरांगेंना फोन केला. उपोषण मागे घेण्याची विनंती महाजनांनी जरांगेंना केली. मात्र सरकारने दोन दिवसांत गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काहीच झालं नाही मग आरक्षणाचं कसं होणार असा सवाल जरांगेंनी महाजनांना केलाय. लेकरांच्या पोटाचा प्रश्न असल्याने आता हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.
आरक्षण घेऊनच या...
दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलीये. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही दिल्लीला गेला आहात तर निर्णय घेऊन या. दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही वेळ देणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं.