`मुंबई कोलमडली तर कोलमडली, त्यांनी हुकूम..`; भुजबळ म्हणाले, `सरकारने जरांगेंना वेठीस धरलं कारण..`
Maratha Reservation Chhagan Bhujbal About Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची आज (23 डिसेंबर 2023) बीड शहरामध्ये इशारा सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Maratha Reservation Chhagan Bhujbal About Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची आज बीड शहरामध्ये सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून जरांगे-पाटील आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलं जात आहे. जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी राज्यातील शिंदे सरकारला दिलेला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम संपुष्टात येण्याच्या एक दिवस आधीच ही सभा घेतली जाणार आहे. असं असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबीमधूनच मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करणारे राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी उपहासात्मकरित्या जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
जरांगेंना लगावला टोला
शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांना, जरांगेंनी सरकारला वेठीस धरलेलं आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना भुजबळ यांनी उपरोधिक शैलीत जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरुन टोला लगावला. जरांगेंनी सरकारला नाही तर सरकारनं जरांगेंना वेठीस धरलं आहे, असं विधान केलं. तसेच जरांगेंनी हुकूम सोडला आहे त्यामुळे मुंबई कोलमडली तर कोलमडली असा उपरोधिक टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी सर्व मराठे आले तर काय होईल अशा अर्थाचं विधान करत राज्य सरकारला इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर उपरोधिकपणे भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया नोंदवली.
सरकारने जरांगेंना वेठीस धरलं
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, "जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय. सरकारने जरांगेंना वेठीस धरलं आहे कारण ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही ताबडतोब. वेळ काढत आहेत. मंत्र्यांना पाठवतात. चर्चा करतात. उलटं आहे," असं भुजबळ म्हणाले.
मुंबई कोलमडली तर कोलमडली
"मुंबईतील संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असा इशारा दिला आहे. यावर काय म्हणाल?" असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भुजबळ यांनी उपरोधिकपणे, "कोलमडली तर कोलमडली. मुंबई, मुंबई काय चीज आहे. त्यांनी हुकूम सोडला आहे ना तर प्रश्न मिटला. मुंबई काय घेऊन बसलात तुम्ही. मुंबईचं कौतुक तुम्ही त्यांच्यापुढे करता?" असं म्हणत जरांगे पाटलांना टोला लगावला.
शाळांना सुट्टी, पोलिसांची सुट्टी रद्द
मनोज जरांगे पाटलांची आज (23 डिसेंबर 2023) बीड शहरामध्ये इशारा सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जरांगेच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी शहरामध्ये मोठी रॅलीही निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील हे 24 तारखेनंतर आंदोलन करणार असल्याची शक्यता असल्याने जालन्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा राक्षणासंदर्भात येत्या काही महिन्यांमध्ये निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात जरांगे पाटील यांच्याशी गुरुवारी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी भेटून चर्चा केली.