Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. अंतरवाली सराटीत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशातच आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींवर (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हे माझे शेवटचे उपोषण असून विधानसभेच्या तयारीला लागा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केले. 


"मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचं षडयंत्र"


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सरकारकडून जाणूनबुजून षडयंत्र सुरु आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना चांगलं समजत होतो आणि यापुढेही चांगलं समजत राहू. आम्हाला सर्व कळतं. कोणाच्या गाड्या येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओसडीने काय षडयंत्र रचले आहेत. काय डाव रचला आहे. हसून खेळून गोड बोलतील आणि कार्यक्रम प्रत्येकवेळी मराठ्यांचा लावतील", असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. 


"आमचा सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र त्यांनी षडयंत्र रचवणं थांबवावं. आमच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि फडणवीस यांची माणसं षडयंत्र रचत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. जर हा प्रकार थांबवला नाही तर त्या लोकांची नावं उघडी करु", असा इशाराही जरांगे यांनी दिला. 


"...तर उपोषण स्थगित करायला अडचण नाही"


"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगतो की त्यांनी मला आरक्षणाबाबत संपूर्ण माहिती द्यावी. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत, त्याला किती दिवस लागणार आहेत? ओबीसीतून आरक्षण देणार की नाही, सगेसोयऱ्यांची व्याख्या मान्य आहे की नाही ही सर्व माहिती फडणवीसांनी द्यावी. त्यांनी त्यांचे लोक इथे पाठवावेत आणि सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसह आमच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण करतील हे सांगावं, त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. सगळं क्लिअर झालं तर उपोषण स्थगित करायला काही अडचण नाही", असेही जरांगेनी सांगितले. 


"मी थेट विधानसभेच्या तयारीला लागणार"


"पण तुम्ही असंच खेळत असाल तर हे माझं शेवटचं उपोषण असणार. मी काही मोकळा नाही, मी थेट विधानसभेच्या तयारीला लागणार”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेवेळी म्हटले. कुणबी हाच मराठा आहे. मात्र सरकार मुद्दामहून जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला. काही जणांना प्रसिद्धी मिळत नाही म्हणून ते अंतरवालीत आंदोलन करायचं म्हणतात, त्यांची गावं जळाली का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.