Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळावलं म्हणून मागील 17 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातांनी फळाचा रस पिऊन जरांगेंनी उपोषण मागेल घेतलं. मुख्यमंत्री शिंदेंबरोबर मंत्री गिरिश महाजन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंबरोबरच इतरही अनेक नेते यावेळेस उपस्थित होते. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात मागील 17 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले होते. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी याच ठिकाणी केलेल्या एका छोटेखाणी भाषणामध्ये 2 दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहामधील पत्रकार परिषदेतील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर भाष्य केलं. त्यांनी घडलेल्या प्रकरणासंदर्भात दिलेलं स्पष्टीकरण देताना प्रसारमाध्यमांवर केलेली टोलेबाजी ऐकून सर्व उपस्थित हसू लागले. जरांगे-पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान ऐकून हसू आलं.


मुख्यमंत्री शिंदेंनी केला वडिलांचा उल्लेख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल असा विश्वास आंदोलकांसमोर बोलताना व्यक्त केला. "हे सरकार देणारं आहे. एकनाथ शिंदे देखील गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्ता आपलाच आहे. मला तुमच्या भावनांची जाणीव आहे. साताऱ्याला जेव्हा आपलं आंदोलन होतं तेव्हा माझे बाबा तयारी करत होते. मी विचारलं कुठे तर म्हणले आंदोलनाला चाललोय. कुठल्या विचारलं तर म्हणाले मराठा क्रांती मोर्चाला. एवढी आपली अटॅचमेंट आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


नक्की वाचा >> तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?


त्या व्हायरल व्हिडीओबद्दल शिंदे बोलले अन् सारेच हसू लागले


"मी फार बोलू इच्छित नाही पण माझी पत्रकारांना विनंती आहे," असं म्हणत शिंदेंनी त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आधीचा आणि पुढचा भाग नसल्याचं सांगितलं. "काल-परवा पत्रकार परिषद झाली त्यातला शेंडा, बुडखा काढला आणि मधला बरोबर दाखवला. अरे असं करु नका. आमचा तुमच्यावर विश्वास आहे. हा म्हणजे विश्वासघात झाला. आम्ही काय बोलत येत होतो की, आज आमची मिटींग रात्री दीड वाजेपर्यंत झाली. साडेबारा एक पर्यंत मिटींग चालली. त्या मिटींगनंतर आम्ही पत्रकार परिषदेत येत होतो. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी, आजच्या पत्रकार परिषेदमध्ये प्रश्न उत्तरं नको, असं म्हटलं. त्यावर मी, प्रश्न उत्तरं नको आणि राजकीय पण काहीच नको. जे आपलं आता मिटींगमध्ये ठरलं आहे. जे ठरलेलं आहे तेवढं बोलायचं आणि निघायचं,' असं म्हटलं. आता यांनी (प्रसारमाध्यमांनी) मागचं काढलं. पुढलं काढलं आणि मधलच धरलं," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


नक्की वाचा >> 'मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही! ही वाघाची जात आहे, फाडून काढू'; जरांगेंच्या मुलीचा एल्गार


मी असा माणूस आहे का ओ?


मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप या व्हिडीओवरुन विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरुन हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत केला होता. यावरुनच बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी, "आता मी असा माणूस आहे का ओ? तुम्हाला फक्त आमिष दाखवणारा. एक लक्षात ठेवा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता इमानदार असेल तर राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या पोटात एक ओठात एक असं आयुष्यात कधी केलं नाही आणि करणार नाही नाही," असा शब्द आंदोलकांना दिला.



मनोज जरांगेंचं कौतुक


मुख्यमंत्री शिंदेंनी आंदोलनकर्त्या मनोज जरांगेंचंही कौतुक केलं. "मनोज हा सच्चा कार्यकर्ता आहे. मी त्याला ओळखतो. हे आंदोलन सखल मराठा समाजासाठी आहे. हिरो बनण्यासाठी त्याचं हे आंदोलन नाही. त्याला समाजाची काळजी आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आपल्या शब्दाचा मान राखत उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगे-पाटील यांचे आभार मानले.