शिर्डी : मुंबईतील मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने उंदीर मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, या मोहीमेत घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. त्यानंतर भाजप गोट्यात जोरदार हलचल झाली.  सात दिवसांत मंत्रालयातील तीन लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्यात आल्याचा दावा खडसे यांनी करताच मोठा भूंकप झाला. त्यानंतर भाजप नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. उंदीर प्रकरणावरुन चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देव सुबुद्धी देवो, असे सांगत एकनाथ खडसे यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला.


 चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देव...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याच सरकारवर उंदीर घोटाळयाचा गंभीर आरोप करणारे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना काल भाजप आमदारांकडून प्रत्युत्तर दिले. घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी खडसे यांचे आरोप फेटाळले होते. तर आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे यांना उत्तर दिले. मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी काही गोळया ठेवण्यात आल्या होत्या. याचा अर्थ प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असा होत नाही. चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देव बुद्धी देवो असे म्हणत मुनगंटीवार यांनी नाव न घेता टोला लगावला.


मंत्रालयात उंदरांनी फायली कुरतडू नये म्हणून काही गोळया ठेवल्या होत्या. जेवढया गोळया होत्या तेवढे उंदीर मेलेच पाहिजेत, असा अर्थ काढणं योग्य नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या मुनगंटीवार यांनी उंदीर घोटाळयाच्या आरोपावर पत्रकारांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिले. 



एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल


 उंदीर निर्मूलनासाठी निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आणि सात दिवसांत मंत्रालयातील तीन लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्यात आले. याचा अर्थ, प्रत्येक दिवसाला ४५ हजार ६२८.५७ उंदीर मारण्यात आले. म्हणजे प्रत्येक मिनिटाला ३१.६४ उंदीर मारले गेले. प्रत्येक दिवशी मारण्यात आलेल्या उंदरांचे वजन ९१२५.७१ किलो एवढे, म्हणजे, एक ट्रक भरेल एवढे उंदीर एका दिवसात आले. एवढ्या उंदरांची विल्हेवाट कुठे लावली? त्यांचे दफन केले, की त्यांना जाळले, याची काहीच माहिती उपलब्ध नाही!, असे सांगत विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे.