Deepak Kesarkar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्येच आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतले रुसवे फुगवे संपल्यानंतर आता आरोपांच्या फैरी सुरु झाल्यात. माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपद न मिळण्यामागे काही नेते असल्याचा आरोप केलाय. मंत्रिपद मिळू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांची किव वाटत असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्र्यापेक्षा मोठं पद मिळेल असं दीपक केसरकर यांनी सांगितलंय. दीपक केसरकर यांच्या या दाव्यानं त्यांना राज्यपालपदासारख्या मोठ्या पदाचे वेध लागलेत की काय अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. दीपक केसरकर यांच्या मंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. केसरकर यांनी मंत्रीपद मिळालं नाही यामुळे ते नाराज आहेत. केसरकर हे साईबाबांचे भक्त आहेत. तसेच त्यांचे मोठ्या लोकांशी चांगले संबंधही आहेत. दीपक केसरकर यांना देवानं मंत्रिपद दिलं होतं, पुढंही देव देईल असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.


रिफायनरीवरुन जुंपली


कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये परस्पर विरोधी मते असल्याचं दिसून येत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या पुनर्विचाराबाबत उदय सामंत यांनी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरही दीपक केसरकर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. उदय सामंत यांना जगातलं सगळं कळत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.


तर कंपनी तयार असेल तर रिफायनरी ही  शंभर टक्के होणार असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलं. कोकणातील रिफायनरी प्रकल्प हा राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरु असताना भाजपचे खासदार नारायण राणे यांचे हे विधान खूप चर्चेत आलं आहे.  


इतरही अनेक मंत्री नाराज


दीपक केसरकर यांच्यासारखे इतरही अनेक मंत्री नाराज आहेत. त्यांची नाराजी कमी झालेली नाही. उलट महायुतीत नाराजी व्यक्त करण्याची सोय नाही. त्यामुळे शिवसेनेतल्या या खदखदीचा पुढच्या काळात स्फोट होण्याची शक्यता आहे.