Maratha Aarakshan Who Is Manoj Jarange: जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची विराट सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी झाली असून सकाळपासूनच या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या सभेसाठी 5 हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. अगदी रुग्णवाहिकांपासून, पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि प्रसाधनगृहांपासूनच वाहनतळांपर्यंत सर्व सोयी सभेच्या ठिकाण करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टीमेटम संपल्याने मराठा बांधवांसमोर आज मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र राज्यातील सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट आव्हान देणारे, लाखो मराठ्यांना आंतरवाली सराटीमध्ये या छोट्याश्या गावात एकत्र करणार मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?


आंदोलन, लाठीचार्ज अन् महाराष्ट्रभर पडसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. या प्रकरणाचे पडसाद पुढील अनेक दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटले. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं. ज्या ठिकाणी हा लाठीचार्ज झाला तिथे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होते. लाठीचार्ज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यासारखे नेते मनोज जरांगे यांना भेटू आले आहेत. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्न केले. अखेर आरक्षण देण्यासाठी महिन्याभराचा वेळ मागून राज्य सरकारने जरांगेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भातील तडजोड यशस्वीपणे केली. आता जरांगेना दिलेला कालावधी संपत आल्याने त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.  या सर्व आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगेंबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात...


मराठा आंदोलनासाठी जमीन विकली


मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज मूळचे बीडमधील मातोरीचे रहिवाशी आहेत. मात्र मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.


मागील एका दशकाहून अधिक काळापासून संघर्ष


पांढरा पायजमा आणि 3 गुंड्यांचा शर्ट, गळ्यात भगवा आणि छोटीशी वाढलेली दाढी अशाच लूकमध्ये मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे अगदी मंत्रालयापासून ते आंदोलनापर्यंत सगळीकडे दिसत आहेत. मागील एका दशकाहून अधिक काळापासून मनोज जरांगे सातत्याने मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत. जरांगे यांनी या कालावधीमध्ये अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले, तरुणांना संघटित करुन आपली मागणी लावून धरली. मराठ्यांसाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांना संपूर्ण मराठवाड्यात ओळखलं जातं. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई-वडील असा मनोज यांचा परिवार असून त्यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.



काही काळ काँग्रेसमध्ये काम केलं


मनोज यांनी सुरूवातीला काही काळ काँग्रेस पक्षासाठी काम केलं. मात्र त्यांनतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि कधीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी स्वत:ची शिवबा संघटना स्थापन केली. त्यांनी फार आक्रमक पद्धतीने मराठ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केली. महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये मनोज जरांगेच्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच आरोप झाले.


मोर्चे, आंदोलने, चळवळ अन् मंत्रालयातील भेटीगाठी


मराठा आरक्षणासाठी मनोज यांनी आतापर्यंत 30 ते 40 आंदोलने केली आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहागडपासून मंत्रालयावर 60 किमीपर्यंत मोठा मोर्चाही त्यांनी नेला होता. या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं आणि त्याची राज्यभर चर्चा झालेली.  त्यांनी अनेक मराठा आंदोलनांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण का गरजेचं आहे याबद्दल माहिती देऊन मराठ्यांना एकत्र केले. अनेकदा त्यांनी आपली निवेदने आणि मागण्यांसाठी मंत्रालयाचा उंबरठाही झिजवला आहे. ते अनेकदा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये 'वर्षा' बंगल्यावरही गेले.  मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या सांगण्यानुसार, या माणसाचं आजपर्यंतच निम्मं आयुष्य हे मोर्चे, आंदोलने, चळवळ आणि सरकारी इमारतीच्या पायऱ्या झिजवण्यात गेलं.