मुंबई : कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा एल्गार. शाहू महाराजांच्या समाथीस्थळी आंदोलनकर्ते एकत्र आलेत. यावेळी अनेक आमदार, खासदार उपस्थित असताना सगळ्यांचं लक्ष हे खासदार धैर्यशील माने यांनी वेधून घेतलं आहे. खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दरम्यान धैर्यशील माने नुकतेच कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. 


या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे.


आज सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले. त्यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं.


संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी उलटसुलट न बोलण्याचं आवाहन केलं आहे.  सर्वच आंदोलक काळ्या पोशाखात आले होते. स्वत: संभाजीराजेही काळ्या पोशाखात आले होते. सर्व आंदोलकांनी काळे कपडे घालतानाच तोंडावर काळा मास्क लावला होता. सरकारचा निषेध करण्यासाठीच सर्वांनी काळा पोशाख परिधान केला होता. तसेच आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं होतं.