आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा
Maratha Reservation: सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले.
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमधून 4 महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर महादिवाळी साजरी करणार असल्याचे ते म्हणाले.
सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. मनोज जरांगे पाटील हे उद्या, 29 जानेवारी रोजी जरांगे रायगडावर जाणार आहेत तसेच परवा रायगडावर दर्शन घेणार आहेत. आंदोलन सुरु ठेवण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम आहेत.
फडणवीस, पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर
मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेणार नाही असे फडणवीस म्हणाले. याला जरांगे पाटलांनी उत्तर दिले. मग आंदोलन सुरुच राहणार, असे जरांगे म्हणाले. आता लाख मराठाऐवजी लाख ओबीसी, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी दिली होती. यावर उत्तर देताना दोन्ही आम्हीच असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
उपोषण सोडलं
मनोज जरांगे यांनी आंतरवाली गावातून उपोषण करुन मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुंबईत धडकताच शिंदे सरकारला त्यावर तोडगा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला. नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली. सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही ही मागणी सरकारने मान्य केली. कुणबी नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे आणि शपथपत्र घेऊन सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या ही मागणी मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं.
त्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांनी संधी गमावली हा त्यांचा विजय नाही, अशी टीका केली. भुजबळांच्या या टीकेकडे मनोज जरांगे यांनी दुर्लक्ष केलं असं सगळ्यांना वाटलं. मात्र आंतरवालीमध्ये दाखल होताच त्यांनी भुजबळांसह वकील गुणरत्न सदावर्ते यांचा खरपूर समाचार घेतला. 'वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका' असा सल्लाही त्यांनी आंतरवाली गावातील जमलेल्या समर्थकांना दिला.