मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
कोल्हापूर : मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. कोल्हापूरच्या मराठा गोलमेज परिषदेत घोषणा करण्यात आली आहे. मराठा समाजातील मुलामुलींचा फी परतावा आणि मेगा भरतीला स्थगिती देण्याची मागणी करत रविवारी पुण्यात आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजाच्या मुलामुलींना चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसंच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावे, स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, यासह अनेक मागण्यांचा ठराव गोलमेज परिषदेत मंजूर करण्यात आला.
गोलमेज परिषदेला राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले. गोलमेज परिषदेचे आमंत्रक आणि मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील ४८ खासदारांचे पुतळे जाळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याच बरोबर १ ऑक्टोबर नंतर राज्यातील १८१ आमदारांचे पुतळे जाळणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
6\
दरम्यान, मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारनं अनेक निर्णय घेतले असले तरी मराठा संघटनांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. मराठा समाजाचा EWSमध्ये समावेश करणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखं असल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाने केली. मराठा क्रांती मोर्चा पुण्य़ात रविवारी सर्व पक्ष कार्यालयांसमोर आक्रोश आंदोलन करणार आहे. राज्य सरकारनं घेतलेले निर्णय जुनेच असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी झालेले शाळा कॉलेज प्रवेश आणि सरकारी नियुक्त्या संरक्षित करण्याची मागणी क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. तर पोलीस भरतीतील मराठा समाजासाठी आरक्षित जागांचे काय करणार याबाबतही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.