पुणे : विनापरवाना स्पीकर वापरल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर दीड महिन्याने गुन्हा दाखल
Maratha Reservation : मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याआधीही मनोज जरांगेंवर बीड आणि नांदेड या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे सार्वजनिक ठिकाणी विना परवाना स्पिकर लावून, सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली असून जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने जात असताना 23 जानेवारी रोजी रात्री वाघोली येथील चोखी ढाणी रोडच्या मैदानावर मुक्काम होता. वाघोलीतील समन्वयकांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे परवानगीचा अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात जरांगे पाटील वाघोलीत पहाटे 4 वाजता पोहोचले आणि एक तासभर पहाटेची सभा झाली होती. आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे.