जालना : मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. त्याचवेळी  राज्य सरकार चांगली बाजू मांडेल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडणारे वकील रोहित यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यावर आज सुनावणी होणार असून यावेळी राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडतील असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण यांनी वकिलांच्या टीमला पूर्ण सहकार्य करावे, असं आवाहन देखील त्यांनी केले आहे. आजची सुनावणी पाच बेंचकडे देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी मागे आपल्याला दिल्याचेही संभाजीराजे म्हणाले.


मला आरक्षण नको पण राज्यातील ८५  टक्के गरीब मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, अशी मागणी खासदार संभाजी राजे भोसले यांनी केली आहे. काल जालना शहरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषद पार पडली. या परिषदेत ते बोलत होते. यापुढे मराठा समाजाला बहुजनांच्या प्रवाहात आणायचे आहे .मराठा समाजाला आरक्षण देणं ही राज्य सरकारची प्रथम जबाबदारी आहे असे सांगायलाही संभाजीराजे विसरले नाहीत. 


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना सगळ्यांना एकत्र आणलं,मग आज का मराठा समाजाला वेगळे ठेवले जात आहे, असा सवाल उपस्थित करत दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवायचा आहे. मात्र पानिपत होऊ द्यायचे नाही, असा सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत. मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी हा दिवस जेवढा जोर लावायचा तेवढा लावावा. नंतर हे राहिलं ते राहील हे चालणार नाही, असा ईशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.


सारथी संस्थेला स्वायतता द्यायला सरकारने दीड वर्ष वेळ लावला आता या संस्थेत चांगली माणसे घेऊन संस्थेला एक ते दीड हजार कोटी रुपये द्या, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली. खांद्याला खांदा लावायला जोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यत मि तुमच्या सोबत आहे असा विश्वास देत या आरक्षणाची रेस आपल्याला जिंकायचीच आहे असा विश्वास देखील संभाजीराजे यांनी या परिषदेत व्यक्त केला.