गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या: मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर आरोप, मनोज जरांगे म्हणतात...
Gunaratna Sadavarte Car: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील विविध ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ही तोडफोड केली असून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही आंदोलक तरुणांकडून करण्यात आल्या आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती. त्यावरुन मराठा तरुणांनी तोडफोड केल्याची चर्चा आहे. गुरुवारी आज पहाटेच्या सुमारास ही तोडफोड करण्यात आली आहेत.
गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवर येथे राहतात. त्याच्या बिल्डिंगच्या खाली असलेल्या गाड्यांची तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या दोन गाड्या मराठा क्रांती मोर्च्याच्या तरुणांकडून फोडण्यात आल्याचे कळतंय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना अटक केली आहे.
मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून गुणरत्न सदावर्ते सातत्याने समाजावर टीका करत होते. त्यामुळं मराठा समाज नाराज होता. गुणरत्न सदावर्ते यांना बोलू नका, असाही इशारा देण्यात आला होजा. जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला होता. गुणरत्न सदावर्ते यांना कोणीतरी बोलायला लावतेय किंवा प्रवृत्त करतेय, असं बोललं जात होतं. त्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्याची तोडफोड केली आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मराठा तरुणांकडून तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा बांधवांनी तोडफोड करु नका, कारण आपण त्याचे समर्थन करत नाहीत. पण आंदोलन आपण करायचंय. पण ही तोडफोड मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या मुलांनीच केलीये हे कशावरुन. दुसरं कोणी केलं असेल पण ते मराठा समाजाच्या पोरांनी हे केलं असेल असं मला वाटतं नाही. परंतु तसं कोणी करु नका आपल्याला शांततेत लढाई करायची आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. ते महान व्यक्ती आहेत. त्यांना कोणताही समाज असला तरी गरळ ओकण्याची विष पेरायची सवय आहे. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. समाजाचा निर्णय समाज घेतोय पण या हल्ल्याचं समर्थन करणार नाही ते समर्थना योग्य नाहीये, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.