Maratha Reservaiton : कलंक लागलेला मंत्री, दंगली भडकवणारा, वाया गेलेला म्हणजे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) असा जोरदार हल्लाबोल करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळ राजद्रोहाचा प्रकार करतायत, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर हल्ला चढवला. सभेच्या सुरुवातीपासूनच जरांगेंनी भुजबळांवर चौफेर टीका केली. त्याचवेळी भुजबळांच्या दबावात येऊन आरक्षण (Reservation) रोखाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. तसंच 2 दिवसांत अंतरवालीमधले आणि एका महिन्यात महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगेंनी केली. जालन्यात मनोज जरांगेंची सभा झाली. या सभेतून जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. 17 डिसेंबरला अंतरवाली सराटीत मराठ्यांची बैठक होणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ हे बुरसटलेल्या विचारांचा नकल्या आहेत, नकला करणं भुजबळांचा धंदाच आहे. ज्यांनी मोठे केलं त्यांनाच भुजबळांनी पायाखाली तुडवलं, अशी टीकाही जरांगेंनी भुजबळांवर केलीय..


जालन्यात जाहीर सभा
मनोज जरांगे पाटलांची जालना शहरात जाहीर सभा पार पडली. जरांगेंवर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली . महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला या सभेपासून सुरूवात होत असून, मराठवाडा, खान्देश, विदर्भ असा दौरा ते करणार आहेत..या सभेला लाखो मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. जरांगेंचं व्यासपीठावर आगमन होताच गर्दीतल्या लोकांनी मोबाईलचा टॉर्च पेटवून त्यांचं स्वागत केलं. 


भुजबळ यांच्यावर बोचरी टीका
भाषणाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उडवली. आता ते काही झोपत नाहीत असं म्हणज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. घटनेच्या पदावर बसतो आणि महापुरुशांचे जाती काढणारा कलंक म्हणजे भुजबळ, ओबीसी आणि मराठा एकत्र राहत असताना दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे भुजबळ,  इतक्या खालच्या दर्जाचा मंत्री आजपर्यंत महाराष्ट्रात झाला नाही, राज द्रोहा सारखा प्रकार हा करतो असा हल्लाबोल जरांगेंनी केली. मराठ्यांच्या नोंदी शासकीय आहेत तरी ही मराठयांना आरक्षण न देण्याचा चंग भुजबळ यांनी बांधला आहे. मराठयांना आरक्षण भुजबळ यांनी मिळू दिलं नाही, सरकार यांच्या दबावाखाली आल्यानं मराठ्यांच्या नोंदी दाबल्या असा आरोप जरांगेंनी केला.


 हे मला शत्रू दुष्मन मानतात, मी  माझ्या जातीच्या वेदना मांडल्या. आरक्षण नसल्याचा त्रास मी मांडला. जास्तीच आरक्षण तू खातो आमचं आम्हाला दे ही गरिबांसाठी मागणी केली, तू मराठा समाजला दुष्मन मानत असेल तर काय करायचं ते कर आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही,  जर आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला बाथरूम देखील उघडता येणार नाही असा इशाराच जरागेंनी दिलाय.  गरीबांशी दगाफटका करू नका. त्याच्या एकट्याच्या दबावाखाली येऊन काम केलं तर तुम्हाला सुट्टी नाही असा इशाराही सरकारला दिला आहे. सरकारने यापुढे विशेष करून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अजित पवार यांनी याच्या दबावात येऊन मराठ्यांचा घात केला तर तुमची गाठ मराठा समाजाशी आहे असं जरांगेंनी म्हटलंय. 


तुम्ही मागणी केली म्हणून 24 डिसेंबर तारीख दिली.आता डेंजर आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे,गृहमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या वतीने 3 मंत्री आले होते यांनी सांगीतलं संगळे गुन्हे मागे घेऊ कुणालाही अटक करणार नाही मग का अटक केली असा सवाल जरांगेंनी विचारला आहे.  आमच्या लोकांना का अटक केली.?आमचे लोक न्यायालयीन कोठडीत असताना नंतर पोलीस कोठडी का दिली.? तुम्ही विश्वास घातकी सरकार आहात असा आरोप जरांगेंनी केलाय.


24 डिसेंबरच्या आत आम्हाला आरक्षण द्या,अन्यथा जड जाईल याची दखल घ्या,  24 तारखेनंतर  गुन्हे मागे घेतले नाहीत, आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रतील मराठा समाजाची 17 डिसेंबर अंतरवाली किंवा अन्य ठिकाणी बैठक घेऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय.  उद्यापासून सगळ्या गावात साखळी उपोषण सुरू करा असं आवाहन जरांगेंनी केलंय.