Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून, विशेष अधिवेशनाआधी सरकारच्याही हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मराठा आरक्षणसंबंधीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी सरकार सध्या योग्य तो निर्णय घेत असून, आता मनोज जरांगे यांनी उपोषण करणं उचित नसल्याची बाब अधोरेखित करत हे उपोषण मागे घ्यावं असं आवाहन त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, इथं सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच तिथं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खाल्यावल्यामुळं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. परभणी जिल्ह्यात गुरुवारी रात्री पासून रास्तारोको आंदोलन सुरू आहे, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड नांदेड महामार्गावरील मरडसगाव फाटा येथे शेकडो मराठा बांधवानी गुरा ढोरांसह रास्तारोको आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता वाढता पाठिंबा मिळत आहेय 


मरडसगाव,गोपा, नरळद येथील मराठा तरुणांनी हा महामार्ग अडवला असून, जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत इथून न उठण्याचा निर्धार या तरुनांनी केला आहे. या आंदोलनामुळं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर जिल्हाभरात शुक्रवारी मराठा संघटनांच्या वतीने चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 


धाराशिवमध्ये आरक्षण आंदोलनाची धग 


धाराशिव जिल्ह्यातही काही दिवसांपासून जाणवणारी मराठा आरक्षणाची धग आता आणखी तीव्र झाली आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव एसटी महामंडळाने जिल्ह्यातील बस सेवा तूर्तास बंद केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच एकही बस रस्त्यावर धावताना दिसली नाही. गुरुवारी (15 फेब्रुवारी 2024 ला) जिल्ह्यात दोन बसवर दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान, धाराशिव शहरात बंदचा हा तिसरा दिवस असणार आहे.  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील शिवाजी चौकात गुरुवारपासूनच मराठा आंदोलक कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहे. तर तुळजापूर ,कळंब, लोहारा, परंडासह उस्मानाबाद शहरात रास्ता रोको करण्यात येणार आहे. 


हेसुद्धा वाचा : 'हे उचित नाही'; मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंना आवाहन


मराठा आरक्षण आंदोलन आता गंभीर वळणावर आलं असून, सकल मराठा समाजाच्या वतीने बार्शी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बार्शीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शी बंदची हाक देण्यात आली आहे. सध्या या शहर तालुक्यातील अनेक गावात मराठा बांधव आक्रमक दिसत असून, शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या बंदच्या धर्तीवर बार्शी शहरात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. दरम्यान, राज्यामध्ये तीव्र होणारं हे मराठा आंदोलन आणि त्यावर सरकारची भूमिका पाहता आता शुक्रवारच्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.