सरकारने जुनेच पाढे वाचले, जीआर आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; जरांगे यांची स्पष्टोक्ती
Manoj jarange Reaction: सरकारचे शिष्टमंडळ मराठ्याच्या आरक्षणाचा जीआर घेऊनच येईल. आम्ही त्यांची देवासारखी वाट पाहतोय. आम्ही अधिकृत काही बोलणार नाही. सरकारच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहोत, असे जरांगे म्हणाले.
Manoj jarange Reaction: जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. या प्रकरणाचे पडसाद मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटत आहेत. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्यावतीने याबद्दल माफी देखील मागितली. दरम्यान मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारचे शिष्टमंडळ मराठ्याच्या आरक्षणाचा जीआर घेऊनच येईल. आम्ही त्यांची देवासारखी वाट पाहतोय. आम्ही अधिकृत काही बोलणार नाही. सरकारच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहोत. आरक्षणाचा जीआर जर आला नाही तर आरक्षण थांबणार नाही. उद्यापासून पाणी देखील सोडू असे यावेळी जरांडे म्हणाले.
सरकारने माफी मागितली ही चांगली गोष्टी आहे. पण माफी मागताना तुमच्या आई बहिणींना मारणाऱ्यांना कायमचे बडतर्फ करा. आम्ही काय मर्डर करणारे नाही, तरी आमच्यावर तसे गुन्हे दाखल झाले आहेत.,असे जरांगे म्हणाले.
कोण आहेत मनोज जरांगे?
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज मूळचे बीडमधील मातोरीचे रहिवाशी आहेत. मात्र मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. मात्र त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.