मनोज जरांगे रिटर्न्स! पुन्हा एकदा उपोषण... `आता जीव गेला तरी माघार नाही`
Manoj Jarange Returns : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत, गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकताय.
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजी नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. सरकारने परवानगी दिली किंवा नाही तरी 8 जूनपासून आंदोलन (Hunger Strike) करण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशाराच दिलाय. गोळ्या घाला की जेलमध्ये टाका मी समाजासाठी मरायला तयार आहे आता माघार नाही असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय. तर उपोषणाला गावकऱ्यांनी केलेला विरोध हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय.
पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. कारण उपोषणाचा त्रास होत असल्यानं, वडीगोद्री आणि दोदडगाव येथील नागरिकांनी जरांगेंच्या उपोषणाला परवानगी न देण्याची मागणी अंबड तहसीलदारांकडे केली होती..
दरम्यान, अंतरवाली सराटीमध्ये 2023 पासून सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. एक नजर टाकुया अंतरवालीमधील मराठा आंदोलनाच्या आतापर्यंतच्या घडामोडींवर
जरांगेंच्या आंदोलनाचा प्रवास
- 29 ऑगस्ट 2023 - आंदोलनाला सुरूवात
- 1 सप्टें. 2023 - पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज
- 14 सप्टें. 2023 मुख्यमंत्री शिंदेंनी उपोषण सोडवलं
- 14 ऑक्टो.2023 ला जरांगे पाटील यांनी सभा घेत सरकारला आश्वासनाची आठवण करून दिली
- 25 ऑक्टो.2023 ला जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलं
- 2 नोव्हें. 2023 - 8 दिवसांनंतर उपोषण सुटलं
- 20 जाने. 2024 - जरांगे यांच्यासह लाखो मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले. सरकारकडून पुन्हा आश्वासन मिळालं, त्यावेळी गुलाल उधळत जरांगे माघारी फिरले
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जरांगे इफेक्टचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. त्यात जरांगे पाटील 8 जूनपासून उपोषणावर ठाम आहेत. प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं सरकारला परवडणारं नाहीय. त्यामुळे सरकार यातून कसा मार्ग काढतं हे पाहणंही महत्वाचं आहे..