लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. काही ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. तर काही सर्वेक्षण करणाऱ्यांना वाचताही येत नसल्याचे समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सर्वत्र मराठा सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी या वेळेत पूर्ण करायचं आहे. सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी महसूल विभागासह महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरातील सर्वेक्षणासाठी 816 कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केले आहेत. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले मोठ्या प्रमाणात प्रगणक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशिक्षित आहेत. या कर्मचाऱ्यांना वाचता तसेच स्मार्टफोन हाताळता येत नसल्याचे समोर आलं आहे.


त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची भांबेरी उडाली आहे. नगर शहरातील सर्वेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रगनक असलेला कर्मचारी आपल्याला सर्वेक्षण करतात येत नसल्याचं सांगत असून आपण इलेक्ट्रॉनिक मदतनीस असल्याचे सांगत आहे. अहमदनगर महानगरपालिकेकडून मराठा सर्वेक्षणाबाबत सुरू असलेला सावळा गोंधळ या व्हायरल व्हिडिओ मुळे समोर आला आहे.


याबाबत विचारले असता कर्मचाऱ्याने 'मला यातलं काही कळत नाही. मी पालिकेत इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून काम पाहतो. मोबाईल हाताळता येत नाही. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मला यातलं कळत नाही. त्यांनी हे माझ्याकडे नाही, तुम्ही तुमचं बघा, जोडीदार घ्या आणि कसेही काम पूर्ण करा असे सांगितलं,' असं म्हटलं आहे.


मराठा आरक्षण सर्व्हेच्या APPमध्ये असंख्य अडचणी


वाशिम शहरात मराठा कुटुंबाचा सर्व्हे काल पासून सुरू झाला मात्र अॅपमध्ये असंख्य अडचणी येत असून एका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. त्यामुळं सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत सर्व्हे पूर्ण होणे अशक्य असल्याचं सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा सर्व्हे सुरू झाल्यानंतर त्यामध्ये वाशिम शहराचे नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाशिम शहरात दुसऱ्या दिवशी सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेत 182 प्रश्न असून आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रश्न विचारून माहिती भरली जात आहे.


सर्वेक्षणासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात नागरिकांचा आक्षेप.


कोल्हापुरात सर्वेक्षणामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत मराठा समाजातील नागरिक आक्षेप घेतला जात आहे. माजी नगरसेवक विजय साळुंखे सरदार यांनी मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी जे सर्वेक्षण सुरू करण्यात आला आहे त्यातील प्रश्नांवर आक्षेप नोंदवला आहे. शासन असे प्रश्न विचारून आमची मराठा समाजाची अब्रू काढत आहे. मराठा नेतेच आता मतासाठी भिकारी झाले आहे, विजय साळुंखे यांनी म्हटलं आहे.