पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विनायक मेटे चांगलेच आक्रमक झाले आहेत. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत झाली आहे. या समितीने सरकारच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी केली आहे, तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या नाशिक दौऱ्यालाही विरोध केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समन्वय समितीची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीला शिवसंग्राम, छावा क्रांतीवीर सेना, छत्रपती युवा सेना, शिवक्रांती युवा सेना, छावा युवा मराठा संघटन, छावा माथाडी संघटना, अखिल भारतीय मराठा युवा परिषद, बळीराजा शेतकरी संघटना,राष्ट्रीय छावा संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 


मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी सरकारवर टीका केली आहे. 'सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरु असताना त्याकडे महाविकासआघाडी सरकार गांभीर्याने पाहत नाही. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे, त्यामुळे मिळालेले आरक्षण जातंय की काय, अशी शंका आहे, तसंच समाजाचे प्रश्नही प्रलंबित आहेत, अशा परिस्थितीमध्ये अशोक चव्हाणांना हटवावे. एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून जबाबदारी काढून घ्यावी', असं विनायक मेटे म्हणाले आहेत.


'या सरकारच्या मनात मराठा समाजाबद्दल पाप आलंय का? सरकारला जागं करण्यासाठी उद्या ९ ऑगस्टला आंदोलन करणार. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा आहे, या दौऱ्याला आम्ही विरोध करणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौरा रद्द केला तर, हे आंदोलन पुण्यात बालगंधर्व चौकात होईल. मशाली पेटवून, जागरण गोंधळ घालून, काळे कपडे परिधान करून आंदोलन करणार,' असं मेटे यांनी सांगितलं. 


आमच्या मागण्यांसंदर्भात सरकारला निवेदन देऊ, तसंच सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करु. सरकार जोपर्यंत मराठा समाजाला विश्वासात घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आम्ही कोणत्याही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा विनायक मेटेंनी दिला आहे. 


काँग्रेस आणि आघाडी सरकारमधील लोकांना समाजाचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत, त्यांना फक्त पदाचीच पडली आहे. मुख्यमंत्री मातोश्रीतून डोळे झाकून बघत आहे. त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची टीका मेटेंनी केली आहे. 


मागच्या सरकारच्या काळात चंद्रकांत पटलांकडे उपसमितीचे अध्यक्षपद होतं. ते प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा आरक्षण विषयावर बैठक घ्यायचे, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे.