मराठा आंदोलन: पंढरपूरला जाणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या
मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक
सोलापूर : मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी पंढरपूरकडे येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरहून मंगळवेढामार्गे पंढरपूरला निघालेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा ताफा आंदोलकांनी अडवला. माणचूर येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी देशमुख यांचा ताफा अडवला. यावेळी देशमुख यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मणचूर इथले आंदोलक यांच्यात फोनवरुन चर्चा घडवून आणली. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिलं. या आंदोलनामुळे सोलापूर मंगळवेढा बससेवा ठप्प आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आषाढीला पंढरपुरात जमलेल्या सुमारे १० लाख वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट काही लोकांनी आखला आहे. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच महापूजेला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. वारकऱ्यांना अशाप्रकारे वेठीला धरणं चुकीचं आहे. असं करणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊच शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.