Shubhangi Gokhale on Sarvajanik Ganpati: सर्व गणेभक्तांना आता गणेशोत्सवाची (Ganeshotsav) आस लागली असून, आतापासूनच त्यासाठी तयारी सुरु झाली आहे. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या पंडालांमध्ये गणेशमूर्ती तयार केल्या जात असून, नागरिकांचीही मूर्ती कशी असावी, सजावट काय करावी यासाठी आतापासूनच लगबग सुरु आहे. अशातच गणेशोत्सवावर आधारित 'घरत गणपती' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची मोठी फौजच आहे. याच चित्रपटात शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांचीही प्रमुख भूमिका असून त्यांनी ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका आमि चित्रपटाबद्दल सांगितलं. दरम्यान यावेळी त्याने गणेशोत्सवाच्या बदलेलेल्या स्वरुपावर नाराजी व्यक्त करताना सार्वजनिक गणपती बंद व्हायला हवेत असं स्पष्ट मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवाबद्दलच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? किंवा बदललेलं स्वरुप याबद्दल विचारण्यात आलं असता शुभांगी गोखले यांनी सांगितलं की, “माझ्या काही आठवणी नाहीत. मी मराठवाड्याची असल्याने आमच्याकडे काही हे प्रस्थ नाही. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो आणि मुंबईत तर बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपीवरून आलेले लोकसुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे. पण मराठवाड्यात एवढं स्तोम नाही”.


"लोकमान्य टिळकांनी सुरु केल्याने तेव्हा सार्वजनिक गणपतीचे मेळे व्हायचे. ते स्वरुप थोडं कमी होतं किंवा माझ्या वाट्याला तेवढं आलं नाही. त्यामुळे मला तितका अनुभव नव्हता," असंही त्यांनी सांगितलं. 


पुढे त्यांनी सांगितलं की, “पुण्यात आल्यानंतर मुद्दामून पाच मानाचे गणपती पाहून आले. दगडूशेठलाही गेले होते. त्यानंतर मी मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला. पण खरं सांगायचं तर  गणेशोत्सवाचं जे काही अवडंबर झालं आहे. खूप चुकीच्या गोष्टी होत आहेत. सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो पण, मला वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती नाही केले पाहिजेत. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता. 10 दिवस करता आणि त्याच्या मागे संध्याकाळी दारू पिऊन पत्ते खेळत असतात. हे कोणीच अमान्य करू शकत नाही. हे चांगलं नाही. याची आता गरज नाही. हे अजिबातच चांगलं नाही”.


पुढे त्या म्हणाल्या की, “हे सगळं करुन तुम्ही तुमच्याच देवाचा अपमान करत आहात. त्यामुळे आता हे बंद केलं पाहिजे. अनेक छोट्या गावांमध्ये सुबुद्धपणे एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे. तुम्ही का हे करु शकत नाही. सगळी एनर्जी वाया जात असून, सगळ्या प्रकारचं प्रदूषण होत आहे. मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो. काहींच्या तर घरचा गणपतीही मोठा असतो,” असंही त्या म्हणाल्या. मुंबईत पूर्वा पटापटा जाऊन गणपती पाहता यायचं. आता सर्वांनी थोडं शांत व्हायला हवं असा सल्लाही त्यांनी दिला.