मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या ( mansukh hiren death case ) प्रकरणी, पोलिस अधिकारी सचिन वाझे ( sachin vaze ) यांची बदली करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणामुळे राज्याच्या गृहखात्याला मोठ्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी  कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आज दिल्लीत महत्वपूर्ण  बैठक होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तसेच  उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडली प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्या विरोधात एनआयए कडे सबळ पूरावे असल्याचे बोलले जात आहे. 


एनआयएने वाझेंवर केलेले गंभीर आरोप खरे असल्यास, राज्याचे पोलीस दल तसेच गृहखात्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. गृहमंत्री अनिल देशमुख ( anil deshmukh ) यांची सुद्धा याप्रकरणावर उत्तरे देतांना दमछाक होत आहे. 


एकंदरीतच महाविकास आघाडीवर सध्या मोठ्या संकटाची टांगती तलवार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar )  आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( sanjay raut ) यांची आज दिल्लीत भेट होणार आहे. सायंकाळी 4 वाजता शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट होणार आहे. 


शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेही पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत आले आहेत. एकनाथ शिंदेही पवारांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.