योगेश खरे, झी २४ तास, त्र्यंबकेश्वर : आपल्याला 20 च्या पुढचे पाढे म्हणायचे म्हटलं तरी दोन आकडेमोडनंतर ततपप व्हायला सुरुवात होते. तिथे चिमुकल्यांनी चक्क 30 किंवा 40 नाही तर 798चा पाढा म्हटला आहे. हे ऐकूनच काहीतरी वेगळं आणि भन्नाट वाटतं ना. नुसता स्वप्नात जरी विचार केला तरी नको रे बाब होतं. पण या चिमुकल्यांनी ते अगदी सहजपणे केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे चिमुरडे गणितज्ज्ञ आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या हिवाळी ग्रामपंचायतीमधील बेरवळ जिल्हा परिषद शाळेतील रंगीबेरंगी भिंती, त्यावर फुगे, वारली पेंटिंग, विविधरंगी तोरणं अशा या शाळेत गणित, विज्ञानाचे धडे गिरवणारे आदिवासी विद्यार्थी आहेत. इथं 111पर्यंतचे पाढे सर्वांनाच पाठ आहेत, काही जणांनी त्यापुढे मजल मारली आहे.


पहिली-दुसरीची मुलं इंग्रजीत बोलतात, इंग्लिश पेपर वाचतात आणि विशेष म्हणजे बहुतांश मुलं दोन्ही हातांनी लिहू शकतता. ही किमया केली आहे ती  केवळ एका शिक्षकानं. असं म्हणतात की आपल्या लहानपणीच शिक्षक खूप चांगले मार्गदर्शन करणारे मिळाले तर कौशल्यांनाही योग्य वाव मिळतो. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेमकं तेच झालं आहे.



शिक्षक केशव गावित 24 तास गावातच राहातात. आधी 10 ते 5 शाळा असायची. ती त्यांनी 12 तास केली. गावातील लोक जानेवारीनंतर रोजगारासाठी स्थलांतर करतात. तेव्हा मुलांनाही घेऊन जायचे. आता काही स्वयंसेवी संस्थांनी मुलांचं जेवण आणि निवा-याची व्यवस्था केल्यानं शाळेचा पट वाढला आहे.


शिक्षणाचा हा हिवाळी पॅटर्न आदर्श ठरत आहे. शिक्षणतज्ज्ञांना भेट देऊन या शाळेचा अभ्यास करण्यासाठी उद्युक्त करत आहे. गावित सरांसारखे आणखी काही शिक्षक तयार झाले तर आदिवासी भागातील समस्या हे शिक्षण सोडवू शकेल हे मात्र नक्की.