लातूर पालिकेत बहुमत असताना भाजपला मोठा धक्का, काँग्रेसचे महापौर
भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर महानगरपालिकेत सत्तांतर घडून आले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आलेत.
लातूर : राज्यातल्या बदलेल्या सत्तासमीकरणांचे पडसाद राज्यात इतरत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याचा प्रत्यय लातूर महापालिकेत आला आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर महानगरपालिकेत सत्तांतर घडून आले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आलेत. भाजपचे नगरसेवक फुटले आणि काँग्रेसच्या पारड्यात मते पडली. हात उंचावून झालेल्या मतदानात काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ तर भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते मिळाली. भाजपसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे.
लातूर महापालिकेत एकूण ७० नगरसेवक असून भाजपचे ३६ नगरसेवक होते. मात्र, एका नगरसवेकाचे निधन झाल्याने भाजपची संख्या ३५ वर आली होती. तर काँग्रेसचे ३३ नगरसवेक तर राष्ट्रवादीचे २ नगसेवक असे संख्याबळ होते. मात्र, भाजपचे दोन नगरसवेक फुटल्याने भाजपला मोठा धक्का बसला. त्यामुळे पालिकेत सत्तांतर घडून आले आहे.
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथे भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे उमेदवार निवडणून आलेत. दिव्ंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिंरजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे आता आमदार म्हणून निवडणून आले आहेत. तसेच राज्यातील सत्ता समीकरण बदल्यानंतर भाजपला पहिला धक्का हा लातूरमध्ये बसला आहे.