कोल्हापूर : महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज झाली. यात राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांनी बाजी मारली. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. दोन्ही पक्षाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार महापौरपद सध्या राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने महापौर पदासाठी अॅड. सुरमंजिरी लाटकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर भाजपा आणि ताराराणी आघाडीकडून भाग्यश्री शेटके या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांचा पराभव झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४९ व्या महापौर पदी राष्ट्रवादीच्या  सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे. सुरमंजिरी लाटकर यांना ४३ मते तर विरोधी भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार  भाग्यश्री शेटके यांना ३२ मतं मिळालीयेत. राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांनी ९ मतांनी भाजप आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला. शिवसेनेचे चारही नगरसेवक यावेळी गैरहजर होते. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून संजय मोहिते हे निवडणूक रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात भाजप आणि ताराराणी आघाडीकडून कमलाकर भोपळे हे निवडणूक लढवीत होते. त्यांचाही पराभव राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मोहिते यांनी केला. त्यामुळे उपमहापौर पदाची माळ संजय मोहिते यांच्या गळ्यात पडली.


कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडे  बहुमत असतानाही भाजप आणि ताराराणी आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांच्या विजयासाठी तो परावर्तीत करता  आला नाही. दरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेत दोन्ही पक्षानी आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठवले होते. या निवडणुकीत आघाडीने बाजी मारत भाजप-ताराराणी आघाडीला दे धक्का दिला.