मुंबई : राज्यात (Coronavirus in Maharashtra) अनेक जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. पुण्यानंतर नाशिक, सोलापूर, अमरावती, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. आता यात आणखी एका जिल्ह्याची भर पडली आहे. अकोला येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 250 खाटांचे कोविड रुग्णालय (Covid Hospital in Akola ) तातडीने सुरू करण्यात यावे, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख (Medical Education Minister Amit Deshmukh ) यांनी वैद्यकिय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याकामी अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि अकोला जिल्हाधिकारी यांची मदत घेण्यात यावी असेही वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. अकोला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात सध्या 450 खाटांचे कोविड रुग्णालय उपलब्ध आहे. यापैकी 60 खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने तातडीने 250 खाटांचे  नवे कोविड  रुग्णालय सुरू करण्याचे आदेश वैद्यकिय शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.


अकोला येथे सूपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित असून यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांची भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे, मात्र हे कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत न थांबता याच इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या नियोजित कोविड  रुग्णालयातील 250 खाटांपैकी 50 खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या कोविड  रुग्णालयासाठी आवश्यक असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच नर्सेस स्थानिकरित्या नेमण्यात यावेत आणि तातडीने या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात यावे, असे आदेशही वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.