मुंबई : MHADA Konkan Lottery 2021: म्हाडाच्या कोकण मंडळांतर्गत घरांसाठी इच्छूक असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकण मंडळाकडून म्हाडाच्या घरांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. (Mhada Konkan Lottery 2021 Extension Till September 29 For Application Process) मात्र, घरांची सोडत ही 14 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्ज नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी 29 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ( MHADA Konkan Lottery 2021 News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण मंडळाकडून 8205 घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, विरार, बोळींज, मीरा रोड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ही घरे उपलब्ध आहेत. कोकण म्हाडा सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करणे आणि अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार इच्छूक पात्र अर्जदारांना या संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी 29 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांना 30  सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन तसेच बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा (EMD) भरणा 1 ऑक्टोबर रोजी रात्री  11.59 वाजेपर्यंत करता येईल.


सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी आता 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in तसेच https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येतील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता केली जाणार आहे.


म्हाडा घरांची संगणकीय सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी निश्चित झाल्याप्रमाणे 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोस जवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे, असे म्हाडा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.