ठाणे : आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हा गैरप्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन ही परीक्षा रद्द करण्यात असल्याची माहिती दिली. पण परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.


दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविप कार्यकर्त्यानी निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने कार्यकर्ते घराजवळ पोहचू शकले नाही. मात्र निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी त्याठिकाणी आल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता. 


पोलिसांनी यावेळी आंदोलन करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे. दरम्यान अभाविपच्या आंदोलकांना जशास तसं उत्तर दिलंय. आंदोलनकर्त्यांनी पुन्हा पाऊल उचललं तर राष्ट्रवादीकडून त्यांच्या आरेला कारे उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. 


म्हाडातील विविध पदांच्या ५६५ रिक्त जागेसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार होती. १२, १५ आणि १९ डिसेंबरला म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळातील विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार होती. पण त्याआधीच गैरप्रकार उघडकीस आला आहे. ज्या कंपनीकडे हे कंत्राट होते त्यांच्या कडून एक मध्यस्थ पेपर विकत घेणार होता आणि औरंगाबादेतील या प्राध्यापकांना तो विकणार होता अशी माहिती आहे.