सांगली : जिल्ह्यातील, म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचा चौकशी अहवाल 'झी 24 तास'च्या हाती लागलाय. आरोग्य विभागातील डॉक्टर आणि अन्य डॉक्टरांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच भविष्यात, स्त्री भ्रूण हत्या होऊ नयेत आणि बेकायदेशीर गर्भपात टाळण्यासाठी अहवालात, उपाय सूचविण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अहवालावर अद्याप पुढील कारवाई नाही. एकतर वेळेत अहवाल सादर करणे गरजेचे होते. तसेच, दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही. वेळेत अहवाल आणि नंतर कारवाई झाली नसल्याने, सांगली जिल्ह्यात अजूनही बेकायदेशीर गर्भपात सुरूच आहेत. 


फेब्रुवारी २०१७ला संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारी घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली होती. मणेराजुरीत स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यावेळी आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमधील म्हैसाळ गर्भपात प्रकरण उघड झाले होते. त्यावेळी जमिनीत पुरलेले १९ भ्रूण सापडले होते. त्यातील आठ भ्रूण डीएनए तपासणीसाठी पाठण्यात आले.


या प्रकरणात मुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापूरे याच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली होती. याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली होती, या समितीने तात्काळ अहवाल देऊन त्यानंतर अहवालात दोषींवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, अहवाला उशीर झाल्याने ही कारवाई होऊ शकलेली नाही.