Video : विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे आले कुठून? शेवटी `या` माशांचे लोकेशन कळाले
सुरुवातीला पहिल्या नजरेत हुबेहूब पक्ष्याच्या थव्या सारखे दिसणारे हे नेमके काय आहे हे पाहण्यासाठी किनाऱ्यावर असलेले कोळी बांधव पुढे गेले. तेव्हा त्यांना हे पक्षी नसून तारली मासे असल्याचे दिसून आले.
प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : Life of Pi चित्रपटात खोल समुद्रात अडकलेल्या पी पटेलवर लाखो मासे एकाच वेळी हल्ला करतात तो प्रसंग अनेकांनी पाहिलाच असले. पण प्रत्यक्षात असं काही होतं का यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. मात्र विरारच्या (Virar) अर्नाळा किल्ला परिसरातील किनारपट्टीवर (arnala beach) असाच काहीसा प्रकार घडलाय. मोठ्या प्रमाणात मासे एकाच वेळी समुद्रकिनाऱ्यावर आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विरारच्या अर्नाळा किल्ला किनारपट्टीवर लाखो मासे उड्या घेत धडकले. मग काय आयते किनाऱ्यावर आलेले मासे गोळा करण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली.
मासळी उड्या घेत कोळ्यांपर्यंत पोहोचली
एरवी, कोळी, मच्चीमार बांधवाना मासळी पकडण्यासाठी खोल समुद्रात जाऊन मासळी पकडावी लागते. मात्र समुद्रातील ही मासळीच स्वतःहून कोळ्यांपर्यंत पोहोचली. वाविरारच्या अर्नाळा समुद्रात हा सर्व प्रकार घडलाय. अर्नाळा किल्ला किनारपट्टी भागात समुद्रातील मासळी स्वतः उड्या घेत घेत अर्नाळ्याच्या कोळ्यांपर्यंत पोहोचलीय.
मोठ्या प्रमाणात तारली मासे किनाऱ्यावर
दीड ते दोन हजार लोकवस्ती असलेल्या या किल्ल्याच्या किनाऱ्याला गुरुवारी अचानक तारली माशांचा झुंड लाखोंच्या संख्येने किनाऱ्याला धडकला.सुरुवातीला पहिल्या नजरेत हुबेहूब पक्ष्याच्या थव्या सारखे दिसणारे हे नेमके काय आहे हे पाहण्यासाठी किनाऱ्यावर असलेले कोळी बांधव पुढे गेले. तेव्हा त्यांना हे पक्षी नसून तारली मासे असल्याचे निदर्शनास आले.
मासे गोळा करण्यासाठी एकच झुंबड
मग काय समुद्रातील मासळी स्वतः आपल्यापर्यंत आलीय हे गावात कळाल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. हे मासे पकडण्यासाठी गावकरी टब, पिशव्या घेऊन किनाऱ्यावर पोहोचले. गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंतचे सर्व जण हे मासे पकडण्यासाठी धडपड करत होते. अनेकांनी तर हे मासे पकडून घरात शिजविले तर अनेक मच्चीमारांनी ते बाजारात देखील विकले. तर कित्येक मासे अजूनही किनाऱ्यावर कचऱ्यासारखे पडून आहेत.
मासे किनाऱ्यावर कसे पोहोचले हा?
या प्रकारानंतर हा भानामतीचा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात आला असेल! यावर स्थानिक मच्छिमारांनी महत्त्वाची दिली. किनाऱ्यावर आलेले हे मासे तारली मासे होते. मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार तारली मासे हे लाखोंच्या कळपाने खोल समुद्रात पोहत असतात. मोठे मासे ज्या दिशेने जातील त्या दिशेने त्यांच्या मागून हा कळप जात असतो. असाच एक कळप खोल समुद्रात कदाचित मोठ्या माशाच्या मागे पोहत असताना किल्ला परिसराला धडकला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे मासे समुद्रकिनाऱ्यावर आले.
दरम्यान, एरवी हेच मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जाऊन जाळे टाकावे लागत होते. मात्र समुद्रातला खजिनाच आता कोळ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.