आयडियाची कल्पना! भर लग्नात सात तोळ्यांचा हार चोरीला, पोलिसांची युक्ती आली कामाला
लग्न सोहळयात हार चोरीला गेल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि एकच गोंधळ उडाला
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : गुन्हेगार किती हुशार असला तरी पोलिसांसमोर त्याची हुशारी फार काळ टिकत नाही. नागपूरमध्ये एका घटनेत पोलिसांच्या युक्तीमुळे चोरीला गेलेला सात तोळ्यांचा हार एका महिलेला परत मिळू शकला.
काटोल इथली एक महिला नागपुरातील बहादूरा इथं एका लॉनमध्ये लग्न सोहळ्यात सहभागी झाली होती. लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडल्यानंतर वधू पक्षातील सर्व नातेवाईक थोडे विसावले होते. त्याचवेळी या महिलेला आपला सात तोळ्यांचा सोन्याचा हार चोरीला गेल्याचं लक्षात आले.
या महिलेने तिथे उपस्थित नातेवाईकांना विचारपूस केली. पण हारबद्दल काहीच माहिती नसल्याचं तिला उत्तर मिळालं. अखेर या महिलेने हार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली आणि सक्करदरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तिथेृं दाखल झाल्यानंतर माहिती घेणं सुरू केली.
दरम्यान वधू पित्याने नातेवाईकांची बदनामी आणि लग्नात विघ्न नको म्हणून पोलिसांकडे आर्जव केला. पीएसआय नागपुरे यांनी यांच्या कालावधीत कोणी लॉन बाहेर गेले नसल्याची खात्री करून घेतली. त्यामुळे चोरटा लॉन परिसरात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. एकीकडे वधू पित्याची विनंती आणि दुसरीकडे महिलेचा चोरी गेलेला हार शोधण्याचे आव्हान पोलिसांना होतं.
मग काय पोलिसांनी महिलेचा चोरीला गेलेला हार शोधून काढण्याकरता शक्कल लढवली. तिथे उपस्थित सगळ्या नातेवाईकांना एकत्र गोळा केलं आणि सांगितले की आम्ही चोराला अर्धा तासात हुडकून काढू. त्यामुळे ज्यांनी कोणी हार चोरी केला असेल त्यांनी खोलीत गादीखाली तो हार ठेवून बाहेर पडावं असं केल्यास कोणावरी गुन्हा दाखल होणार नाही असं आवाहन केलं.
त्यानुसार एक नातेवाईक खोलीत गेले सर्व नातेवाईक खोलीतून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी खोलीची तपासणी केली आणि पोलिसांना चोरी गेलेला हार गांदीच्या खाली सापडला. अशा प्रकारे नातेवाईकांना न दुखवता त्या महिलेला चोरी गेलेला सोन्याचा हार पोलिसांनी मिळवून दिला.