विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आता नवं राजीनामा नाट्य सुरू झालं आहे. राजीनाम्याचा केवळ इशारा देणाऱ्या भाजपला एमआयएमनं चांगलंच डिवचलं आहे. उपमहापौरपदाचा राजीनामा देऊन भाजपनं औरंगाबाद महापालिकेतली शिवसेनेसोबतची युती तोडली. त्याचवेळी भाजपचे सगळे नगरसेवक राजीनामे देतील, असा इशाराही भाजपनं दिला होता. मात्र भाजपच्या खिशातले राजीनामे काही महापालिका आयुक्तांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले नाहीत. त्यावरून एमआयएमनं भाजपला टोले लगावलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपनं नौटंकी न करता राजीनामे दिले तर एमआयएम नगरसेवक देखील राजीनामे देतील, असं एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे. खरंच भाजपनं राजीनामे द्यावे आणि कारभार आयुक्तांकडे जावा आम्हीही भाजपच्या बाजूने उभे राहू, अखेर भ्रष्टाचारी लोक बाजूला होवून स्वच्छ कारभार तर सुरु होईल असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.


एमआयएमच्या या आव्हानामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली. एमआयएम आम्हाला सांगणारं कोण, असा सवाल करतानाच आधी शिवसेना महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केली आहे. एमआयएमनं स्वत: काय करतं ते पहावे, आमचे राजीनामे आम्ही वरिष्ठांकडे पाठवले आहेत, त्यांचा निर्णय़ आला की आम्ही निर्णय़ घेवू दरम्यानं आता शिवेसनेच्या महापौरांनीही राजीनामा द्यायला हवा. असं भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी म्हटलं आहे.


तर या राजीनामा नाट्याचा तिसरा अंक म्हणजे पुन्हा चार महिन्यांसाठी का होईना, उपमहापौरपदाची निवडणूक घेण्याची तयारी शिवसेनेनं चालवली आहे. या सगळ्या राजकारणात औरंगाबादमधली खोळंबलेली विकासकामं मार्गी लावायला मात्र कुणालाही वेळ नाही, हे दुर्दैव.